मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पायधुनीतील अनैतिक संबंधातून अर्शदअली सादिकअली शेख या ३० वर्षांच्या मूकबधीर आरोपीच्या हत्येप्रकरणी वॉण्टेड असलेला जयपालप्रित सिंग याच्या अटकेसाठी पायधुनी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरु आहे. जयपालप्रित हा सध्या बेल्जियममध्ये वास्तव्यास असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी लुक आऊट नोटीसची प्रक्रिया सुरु केली आहे. या हत्येचा तोच मुख्य सूत्रधार असून त्याच्या आदेशावरुन ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याच गुन्ह्यांत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यात मृत अर्शदअलीचे दोन मित्र शिवजीत सुरेंद्र सिंग, जय प्रविण चावडा आणि पत्नी रुक्साना अर्शदअली शेख यांचा समावेश आहेत. रुक्साना आणि जय यांच्यातील अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले असून याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
सांताक्रुज येथील कालिना परिसरात राहणार्या अर्शदअलीची ४ ऑगस्टला त्याच्याच दोन मित्र जय अणि शिवजीत यांनी बेदम मारहाण करुन डोक्यात तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जयने त्याचा मृतदेह एका ट्रॉली बॅगेत भरला होता. ही बॅग घेऊन दादर रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्याला आरपीएफ हवालदार संतोषकुमार रामराज यादव याने ताब्यात घेतले. बॅगेची तपासणी केल्यानंतर हत्येचा हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट करण्याच प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर शिवजीत आणि जय या दोघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत जयचे अर्शदअलीची पत्नी रुक्सानासोबत अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आले होते. या संबंधाला तो मोठा अडसर होता, त्यामुळे जयने शिवजीतच्या मदतीने त्याची हत्या केली होती. या हत्येची पूर्वकल्पना रुक्सानाला होती. त्यामुळे रुक्साना नंतर पोलिसांनी अटक केली. मृत आणि तिन्ही आरोपी मूकबधीर आहेत. त्यामुळे त्यांच्या चौकशीसाठी एका दुभाषिकाची मदत घेण्यात आली होती. तुतारी एक्सप्रेसने प्रवास करताना त्याला ही बॅग प्रवासादरम्यान फेंकून हत्येचा पुरावा नष्ट करायचा होता, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला गेला.
या संपूर्ण कटात जयपालप्रित सिंग याचा सहभाग उघडकीस आला आहे. तो अनिवासी भारतीय असून मूळचा पंजाबचा रहिवाशी आहे. सध्या तो बेल्जियमला वास्तव्यास आहे. हत्येच्या वेळेस जयने त्याच्या मोबाईलवरुन व्हिडीओ शूटींग केले होते. तो व्हिडीओ त्याने जयपालप्रितला पाठविला होता. हत्येच्या वेळेस त्याने त्याच्यासह रुक्सानाला व्हाईट तसेच व्हिडीओ कॉल केले होते. या हत्येसाठी आर्थिक व्यवहार झाले होते. हत्येच्या आधीपासून जय हा त्याच्या संपर्कात होता. त्यानेच अर्शदअलीच्या हत्येच्या कटाची योजना बनविली होती. त्यामुळे जयपालप्रित सिंगच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याच्या अटकेसाठी लुक आऊट नोटीसची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच संबंधित कागदपत्रे सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाठविण्यात येणार आहे. त्याच्या अटकेनंतर या हत्येमागील अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.