म्हाडा फ्लॅटच्या नावाने महिलेची ६० लाखांची फसवणुक
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल; अनेकांना गंडा घातल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – करीरोड येथे म्हाडातर्फे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणार्या महिलेची सुमारे ६० लाखांची फसवणुक झाली. याप्रकरणी पंकज जनार्दन सावंत या आरोपीविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी ४०९, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पंकजने या महिलेसह अनेकांना म्हाडाच्या फ्लॅटच्या नावाने गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीनंतर पंकज हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
५८ वर्षांची तक्रारदार महिला मानसी महेंद्र पितळे ही सीएसएमटी, बोरा बाजार परिसरात तिच्या मुलासोबत राहते. तिच्या पतीचे निधन झाले असून ती सध्या शहीद भगतसिंग मार्गच्या बेस्ट लॉजिस्टिक कार्यालयात अप्पर डिव्हीजन क्लार्क म्हणून कामाला आहे. २०१४-१५ साली ती चिराबाझार येथील म्हाडाच्या एका फ्लॅटमध्ये रहत होती. याच फ्लॅटमध्ये राहत असताना तिचे सासरे केशरीनाथ आणि पती महेंद्र चितळे यांचे मार्च २०१३ रोजी निधन झाले होते. त्यामुळे तिला म्हाडाचा फ्लॅट तिच्या नावावर करायचा होता. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु असताना तिला तिच्या एका परिचित महिलेने पंकज सावंत याचे नाव सुचविले होते. त्याची म्हाडामध्ये ओळख असून तोच तिचे काम करेल असे सांगितले होते. त्यामुळे तिने पंकजला फोन करुन म्हाडाचा फ्लॅट तिच्यावर नावावर करण्यास मदत करण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने तो फ्लॅट तिच्या नावावर करुन दिले होते. त्यामुळे तिला पंकजवर विश्वास बसला होता. चार वर्षांपूर्वी त्याने तिला करीरोड येथे म्हाडातर्फे एका इमारतीचे बांधकाम सुरु असून तिथेच तिला एक फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी त्याने त्याच्याकडे म्हाडाची जुना फ्लॅट असून तोच फ्लॅट तिच्या नावावर करुन देतो असे सांगितले होते. तिच्या कागदपत्रांची पूर्तता करणे, फाईल बनविले आणि म्हाडा अधिकार्यांना मॅनेज करण्यासाठी त्याने तिच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते. याच फ्लॅटसाठी त्याने तिच्याकडून एप्रिल २०२० ते एप्रिल २०२४ या कालावधीत ५५ लाख १० हजार रुपये घेतले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा म्हाडा रुमचे कागदपत्रे दिले नव्हते. म्हाडा कार्यालयात तिची फाईल असून ती फाईल लवकरच क्लिअर करुन देतो असे सांगून तो तिला टाळण्याचा प्रयत्न करता होता. दिलेल्या मुदतीत त्याने फ्लॅट दिला नाही म्हणून ती त्याच्या कार्यालयात गेली होती. यावेळी तिला पंकज सावंतने तिच्यासह इतर काही लोकांना म्हाडाचा रुम देतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यापैकी कोणालाही म्हाडाचा फ्लॅट न देता त्याने तिची साठ लाख दहा हजाराची तसेच अन्य काही फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिने काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पंकज सावंतविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पंकज हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पंकजने अनेकांना म्हाडाच्या फ्लॅटच्या नावाने गंडा घातला आहे, त्यामुळे त्याच्याकडून फसवणुक झालेल्या लोकांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.