४० लाखांचे मंगळसूत्र घेऊन कारागिाराचे पलायन

काळबादेवीतील घटना; चोरीच्या गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पॉलिश करण्यासाठी दिलेले सुमारे ४० लाख रुपयांचे ५८२ ग्रॅम वजनाचे २५ सोन्याचे मंगळसूत्र घेऊन एका कारागिराने पलायन केल्याची घटना शनिवारी दुपारी काळबादेवी परिसरात घडली. मोतीयार शेठ असे या आरोपी कारागिराचे नाव असून त्याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या मोतीयारचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

शहाबुद्दीन अमजदअली शेख हे मूळचे डोबिवलीचे रहिवाशी असून त्यांचा काळबादेवी, कदमवाडीत सोन्याचे दागिने पॉलिश करण्याचा कारखाना आहे. त्यांच्याकडे तीन कामगार असून त्यात मोतीयारचा समावेश होता. गेल्या चार महिन्यांपासून मोतीयार हा दागिने पॉलिश करण्याचे काम करत होता. कामात हुशार असल्याने त्यांचा त्याच्यावर प्रचंड विश्‍वास होता. शुक्रवारी १६ ऑगस्टला त्यांना गणेश बाग या कारागिराने ५८२ ग्रॅम वजनाचे ४० लाख रुपयांचे २५ मंगळसूत्र पॉलिश करण्यासाठी दिले होते. ते दागिने घेऊन ते सायंकाळी कारखान्यात आले. यावेळी कारखान्यात गुलाम हुसैन आणि मोतीयार हे दोघेही झोपले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना कामासाठी उठविले होते. दुसर्‍या दिवशी साडेबारा वाजेपर्यंत ते दोघेही काम करत होते. काही वेळानंतर गुलाम हा नमाजासाठी बाहेर गेला. यावेळी कारखान्यात मोतीयार हा एकटाच होता.

दुपारी दोन वाजता शहाबुद्दीन हे कारखान्यात आले होते. यावेळी त्यांना मोतीयार कुठेच दिसून आला नाही. त्यांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेच नव्हता. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे त्यांनी कारखान्यातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात मोतीयार हा कारखान्यातून घाईघाईने बाहेर जाताना दिसून आला. त्यांनी ड्राव्हरमधील दागिन्यांची पाहणी केली असता त्याने ४० लाख रुपयांचे ५८२ ग्रॅम वजनाचे २५ सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून पळून गेलेल्या मोतीयार या कारागिराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी मोतीयारविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page