केवायसी अपडेट व क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह नावाने फसवणुक
भांडुप-प्रभादेवीतील घटना; दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – केवायसी अपडेट आणि क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करण्याचा बहाणा करुन अज्ञात सायबर ठगाने एका महिलेसह दोघांची सुमारे सव्वादहा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार भांडुप आणि प्रभादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकणी दादर आणि भांडुप पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन या ठगाचा शोध केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारीही करत आहेत.
३८ वर्षांचे तक्रारदार स्मित दिलीप मेहता हे कापड व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत जोगेश्वरी परिसरात राहतात. त्यांचा दादर परिसरात कपड्याचा व्यवसाय असून व्यवसायासाठी त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या बँकेतून एक क्रेडिट कार्ड घेतले होते. या कार्डची लिमिट पाच लाख रुपये इतकी आहे. शुक्रवारी १६ ऑगस्टला दुपारी दोन वाजता ते त्यांच्या शॉपमध्ये काम करत होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो त्यांच्या बँकेच्या कस्टमर सर्व्हिसमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचे क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी त्याने त्यांना एक लिंक पाठवून लिंकवरील माहिती अपडेट करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मोबाईलवर आलेली लिंक ओपन करुन त्यात त्यांच्यासह त्यांच्या बँक खात्याची माहिती अपलोड केली होती. काही वेळानंतर दुकानात ग्राहक असल्याने त्यांनी मोबाईलकडे लक्ष दिले नव्हते. याच दरम्यान त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन काही ऑनलाईन व्यवहार झाले होते. अज्ञात सायबर ठगांनी सुमारे पाच लाखांचे ऑनलाईन व्यवहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दादर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या ठगाविरुद्ध तक्रार केली होती.
दुसरी घटना भांडुप परिसरात घडली. निलम रामचंद्र काणेकर ही महिला भांडुप येथे राहत असून ती टीसीएस कंपनीत टीम लीडर म्हणून नोकरी करते. शनिवारी १७ ऑगस्टला तिला संदीपकुमार शर्मा नाव सांगणार्या एका व्यक्तीने कॉल करुन तो एका खाजगी बँकेचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने तिच्या बँकेची केवायसी अपडेट नसून तातडीने केवायसी अपडेट करण्यास सांगितले. काही वेळानंतर त्याने तिला एक लिंक पाठवली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर तिला दुसर्या बँकेचा पेज ओपन झाल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केल्यानंतर संदीपकुमारने त्यांची बँक दुसर्या बँकेच मर्च झाली आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांकडून केवायसी अपडेटची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर त्याने तिच्याकडून बँक खात्याशी संबंधित माहिती काढून तिच्या बँक खात्यातून सुमारे सव्वापाच लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. दोन तासांत अज्ञात ठगाने काही ऑनलाईन व्यवहार केल्याने तिच्या बँक खात्यातून ५ लाख २६ हजार ३७० रुपये डेबीट झाले होते. हा प्रकार उघडकीस येताच तिने भांडुप पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर दादर आणि भांडुप पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.