१.२० कोटीच्या फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या मध्यस्थाला अटक
सर्व्हर साहित्यासह संगणक हार्डवेअरसाठी दिलेल्या रक्कमेचा अपहार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – सर्व्हर साहित्यासह संगणक हार्डवेअरसाठी घेतलेल्या १ कोटी २० लाखांचा अपहार करुन एका नामांकित खाजगी कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी माज ओस्मान सईद नावाच्या एका मध्यस्थाला जुहू पोलिसांनी अटक केली. माजने तक्रारदारासह आरोपींच्या कंपनीसोबत करार करुन मध्यस्थीची भूमिका पार पाडली होती. मात्र दिलेल्या मुदतीत मालाची डिलीव्हरी न करता कंपनीची फसवणुक केली. याकामी त्याला काही ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत गुवेन ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेडचे दोन संचालक मुकेश कुमावत आणि मोहम्मद उमर मोहम्मद आयुब हे सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी आपसांत कट रचून पैशांचा अपहार करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
उमाशंकर विश्वनाथ चौधरी हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत जुहूस्किमच्या जेव्हीपीडी परिसरात राहतात. त्यांच्या मालकीची पशुपती कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीत त्यांच्यासह त्यांचा भाऊ पशुपतीनाथ चौधरी हे संचालक तर मुलगा विदीत उमाशंकर चौधरी हा उपाध्याक्ष म्हणून काम करतो. ही कंपनीत सेबी नोंदणीकृत असून शेअर खरेदी-विक्रीचा व्यवहार करते. त्यांच्या कंपनीला संगणक सर्व्हरची आवश्यकता असल्याने त्यांचा मुलगा विदीत याच्यावर कंपनीने सर्व्हर साहित्य आणि संगणक हार्डवेअर खरेदी करणे, तांत्रिक कामाची जबाबदारी सोपविली होती. जुलै २०२३ साली माज सईदने विदीतशी संपर्क साधून संगणक सर्व्हरसह इतर साहित्यासंदर्भात बोलणीसाठी भेट मागितली होती. त्यामुळे त्याची माजसोबत जुहूच्या एका कॉफी शॉपमध्ये भेट झाली होती. यावेळी त्याने त्यांच्या कंपनीला आवश्यक असलेले चांगले दर्जाचे सर्व्हर साहित्य आणि संगणक हार्डवेअर माफक दरात देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत सविस्तर चर्चा झाल्याने विदीतने माजच्या परिचित गुवेन ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत एक करार झाला होता.
या दोन्ही कंपन्यांमध्ये माज सईद याने मध्यस्थीची भूमिका पार पाडली होती. ठरल्याप्रमाणे विदीत संबंधित कंपनीला जीएसटीसह १ कोटी २० लाख ८७ हजार २०२ रुपयांचे पेमेंट ट्रान्स्फर केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत गुवेन कंपनीने सर्व्हर साहित्यासह संगणक हार्डवेअर या मालाची डिलीव्हरी केली नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीचे संचालक मुकेश कुमावत आणि मोहम्मद उमर यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी लवकरच मालाची डिलीव्हरी केली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या कंपनीसोबतचा करार रद्द करुन मालासाठी दिलेल्या पेमेंटची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी पेमेंट न करता कंपनीची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने उमाशंकर चौधरी यांनी जुहू पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मुकेश कुमावत, मोहम्मद उमर मोहम्मद आयुब यांच्यासह मध्यस्थी करणार्या माज सईद या तिघांविरुद्ध १२० बी, ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच माज सईद याला जुहू पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने मुकेश आणि मोहम्मद उमर यांच्याशी संगनमत करुन ही फसवणुक केल्याची कबुली दिली आहे. पोलीस कोठडीनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांतील कंपनीचे दोन्ही संचालकांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.