आयलँड दूतावास अधिकार्याची सात लाखांची फसवणुक
सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या आरोपीस हरियाणातून अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२४
मुंबई, – वांद्रे येथील बीकेसी परिसरात असलेल्या आयलँड दूतावास अधिकार्याची सुमारे सात लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी एका आरोपीस हरियाणा येथून सांताक्रुज पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सुनिल जगदीश गर्ग असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीसाठी सायबर ठगांना तीन ते चार बँक खाती उघडून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. व्यवसायात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर काही सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
४९ वर्षांचे तक्रारदार सांताक्रुज येथे राहत असून ते आयलँड दूतावास कार्यालयात मॅनेजर म्हणून काम करतात. १७ मेला त्यांना मोहनकुमार नावाच्या एका व्यक्तीने फोन करुन तो फेडेक्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने तैवान येथे एक पार्सल पाठविण्यात आले होते. त्यात पाच पासपोर्ट, तीन क्रेडिट कार्ड, दोनशे ग्रॅम एमडी ड्रग्ज, कपडे, लॅपटॉप आणि ३५ हजार रुपयांची कॅश होती. ते पार्सल कस्टम विभागाने जप्त केले असून त्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरु आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांना विक्रम सिंग नावाच्या गुन्हे शाखेच्या एका तोतया पोलीस उपनिरीक्षकाने कॉल केला. त्यांच्या आधारकार्डचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला आहे. फसवणुकीसाठी आधारकार्डचा वापर करुन अज्ञात व्यक्तीने चार विविध बँक खाते उघडले आहे. या खात्यात मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले आहे. त्यासाठी त्यांची ऑनलाईन कॅमेरा चौकशी होणार असल्याचे सांगून त्याने त्यांना स्काईप ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. या प्रकाराने ते प्रचंड गोंधळून गेले होते. त्यामुळे त्यांनी स्काईप ऍप डाऊनलोड करुन संबंधित व्यक्तीची प्रोफाईल बघितली असता तो खरोखर पोलीस उपनिरीक्षक असल्याचे त्यांचा विश्वास बसला होता. त्यानंतर त्यांना विविध पोलीस यंत्रणेचे लेटर पाठविण्यात आले होते. त्यात त्यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंग, ड्रग्ज तस्करीसह इतर आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशी सुरु असल्याने याबाबत कुठेही वाच्यता करु नका असे त्यांना सांगण्यात आले.
काही वेळानंतर त्याने त्यांना विविध खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला सुमारे सात लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा पाठविली जाणार होती. पहिल्यांदाच त्यांच्यासोबत मुंबई पोलीस दलासह सायबर पोलीस आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशनचे अधिकारी बोलत होते. त्यामुळे ते प्रचंड घाबरले होते. सात लाख रुपये पाठविल्यानंतर त्यांना आणखीन २५ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. या अधिकार्यांकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने त्यांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी ही रक्कम त्यांना प्रत्यक्षात भेटून देण्याचे सांगितले. यावेळी त्याने दिलेल्या पत्ता बोगस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आला. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात तोतया पोलिसांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर या पथकाने तांत्रिक माहितीवरुन ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी संबंधित बँक खाते सुनिल गर्ग याचे असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सायबर सेलची एक टिम हरियाणा येथे गेले होते. या पथकाने हरियाणाचा रहिवाशी असलेल्या सुनिल गर्गला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात सुनिलचा पूर्वी पैसे ट्रान्स्फरचा व्यवसाय होता. या व्यवसायात त्याला प्रचंड नुकसान झाले होते. याच दरम्यान तो काही सायबर ठगांच्या संपर्कात आला होता. त्यांच्याच सांगण्यावरुन त्याने बँक खात्यात तीन ते चार बँक खाती उघडले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. ही रक्कम नंतर तो सायबर ठगांना पाठवत होता. त्यामोबदल्यात त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. खाती उघडण्यासाठी त्याने बोगस कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड प्राप्त केले होते. बँकेत खाती उघडल्यानंतर त्याने सिमकार्ड बंद केले होते. त्याच्या बँक खात्यात आतापर्यंत किती रुपये जमा झाले, त्याला किती रुपयांचे कमिशन मिळाले याचा पोलीस तपास करत आहेत.