मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२४
मुंबई, – मिस्त्री कामाची बॅग चोरी केल्याच्या संशयावरुन सोनू हरिश्चंद्र तिवारी या ३२ वर्षांच्या बिगारी कामगारावर त्याच्याच सहकार्याने हातोड्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सोनू हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याच्यावर शताब्दी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी मनोज या हल्लेखोराविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.
ही घटना सोमवारी रात्री साडेबारा वाजता कांदिवलीतील एस. व्ही रोड, पूर्विका शॉपीजवळील देना बँक सिग्नल फुटपाथवर घडली. सोनू हा बिगारी कामगार असून कांदिवली परिसरात राहतो. त्याचे घरात भांडण झाल्याने तो घर सोडून देना बँक सिग्नलजवळील फुटपाथवर राहत होता. तिथेच मनोज हादेखील राहतो. मनोज हा मिस्त्रीकाम करतो. त्याची मिस्त्री कामाची बॅग चोरीस गेली होती. ही बॅग सोनूने चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्याने त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी रागाच्या भरात त्याने सोनूवर हातोड्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ झालेल्या सोनूला तिथेच टाकून तो पळून गेला होता.
ही माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या सोनूला नंतर शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सोनूच्या जबानीवरुन पोलिसांनी मनोजविरुद्ध हत्येचा प्रयत्नाा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर मनोज हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.