मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२४
मुंबई, – अंधेरीतील एका सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका महिला दलालास पोलिसांनी अटक करुन तिच्या तावडीतून तीन महिलांची सुटका केली. या तिन्ही महिलांना चेंबूरच्या नवजीवन सोसायटी महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केलेल्या पूजा नावाच्या महिलेविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिला विशेष लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रमेश याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पूजा नावाची एक महिला तिच्या इतर सहकार्यांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असून ती तिच्या संपर्कात असलेल्या महिलांना ग्राहकांसोबत विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने पूजाला संपर्क साधला होता. तिच्याकडे काही महिलांची मागणी करुन त्यांना अंधेरीतील एका हॉटेलमध्ये येण्यास सांगितले होते. ठरल्याप्रमाणे पूजा ही तीन महिलांसोबत शनिवारी रात्री अंधेरीतील महाकाली गुंफा परिसरातील एका हॉटेलमध्ये आली होती. यावेळी बोगस ग्राहकांसोबत आर्थिक देवाणघेवाण सुरु असताना तिथे अंमलबजावणी विभागाने कारवाई केली होती. यावेळी पूजाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या तावडीतून पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली. त्यांच्या चौकशीत पूजा ही सेक्स रॅकेट चालवत असून ती ग्राहकांसोबत त्यांना शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याचे उघडकीस आले. ग्राहकांकडून मिळणार्या रक्कमेचा काही हिस्सा या महिला दिला जात होता तर उर्वरित रक्कम ती स्वतकडे ठेवत होती.
या घटनेनंतर पूजासह तिन्ही महिलांना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. मेडीकलनंतर या तिन्ही महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. पूजाविरुद्ध १४३ भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ५ पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन नंतर तिला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत तिला रमेश हा मदत करत होता, त्यामुळे त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.