पावणेसतरा लाखांची सोन्याची लगड घेऊन कारागिराचे पलायन
काळबादेवीतील घटना; कारागिराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२४
मुंबई, – पावणेसतरा लाखांची सोन्याची लगड घेऊन एका कारागिराने पलायन केल्याची घटना काळबादेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरिजूल अब्दुर रशीद मंडल या कारागिराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आरिजूल हा मूळचा कोलकाताच्या परगना, नॉर्थ २४, सोरपूरचा रहिवाशी असून गेल्याच आठवड्यात तक्रारदाराच्या सोन्याच्या कारखान्यात कामाला लागला होता. पळून गेलेल्या आरिजूलच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
जुम्मा मशिद, शेख मेमन स्ट्रिटचे रहिवाशी असलेले सरीफुल रेहमान बिस्वास हे सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांचा काळबादेवीतील विठ्ठलवाडीत बिस्वास आर गोल्ड नावाचे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय असून या कारखान्यात नऊ कामगार कामाला आहे. गेल्या आठवड्यात त्यांचा मित्र सैफुद्दीन बिस्वास हा त्याचा नातेवाईक आरिजूल यांच्यासोबत त्यांच्या कारखान्यात आला होता. आरिजूल हा सोने कारागीर असून त्याला तिथे काम देण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला कामावर ठेवले होते. दिवसभर काम केल्यानंतर आरिजून हा रात्रीच्या वेळेस कारखान्यातच झोपत होता. शनिवारी १७ ऑगस्टला सरीफुल हे त्यांच्या कुटुंबियांसोबत खोपोली येथे गेले होते. सकाळी अकरा वाजता त्यांनी त्यांच्या कामगारांना कॉल केला होता, यावेळी त्यांना आरिजून हा कामाला आला आणि काही वेळानंतर निघून गेला. तो अद्याप आला नसल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी आरिजूलला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्यांनी कामगारांना ड्राव्हरमधील सोन्याची पाहणी करण्यास सांगितले, यावेळी या कामगारांना ड्राव्हरमध्ये पावणेसतरा लाखांची २४० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी कारखान्यातील सीसीटिव्ही फुटेज तपासणी केली असता ती सोन्याची लगड घेऊन आरिजूल याने घेतल्याचे तसेच तो घाईघाईने कारखान्याबाहेर जात असल्याचे दिसून आले. हा प्रकार समजताच ते खोपोलीहून मुंबईत आले होते.
घडलेला प्रकार पोलिसांना सांगून त्यांनी आरिजूलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर एल. टी मार्ग पोलिसांनी आरिजूलविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तो कोलकाता येथे पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी लवकरच एक टिम कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.