बारा वर्षांच्या मुलीवर नातेवाईकाकडून लैगिंक अत्याचार
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पळून गेलेल्या दिराविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२४
मुंबई, – घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका २२ वर्षांच्या नातेवाईक तरुणानेच बारा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार करुन तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी चुलत दिराविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
३२ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर परिसरात राहते. तिला एक बारा वर्षांची मुलगी असून आरोपी हा तिचा चुलत दिर आहे. तो त्यांच्या घराच्या पोटमाळ्यावरच राहतो. १३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत ही महिला तिच्या आईला भेटण्यासाठी तिच्या उत्तरप्रदेशातील गावी गेली होती. यावेळी तिचा पती आणि मुलगी घरात होते. तिचे पती कामावर गेल्यानंतर तिची मुलगी एकटीच घरी राहत होती. हीच संधी साधून तिच्या चुलत दिराने त्यांच्या घरी येऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण करुन हा प्रकार कोणाला सांगू नकोस अशी धमकी दिली होती. गावाहून तक्रारदार महिला आल्यानंतर तिला तिच्या मुलीकडून हा प्रकार समजला होता. त्यानंतर तिने घाटकोपर पोलीस ठाण्यात आरोपी दिराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी तेथून पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. रविवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.