अनिल देसाई यांच्या खाजगी स्वीय सहाय्यकाच्या अडचणीत वाढ
बेहिशोबी मालमत्तेनंतर मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या खाजगी स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. या घटनेला काही महिने उलटत नाही तोवर आता मनी लॉड्रिंगप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाल्याने अनिल देसाई आणि दिनेश बोभाटे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
गेल्या काही महिन्यांत केंद्रीय आणि राज्याच्या तपास यंत्रणेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्याविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतल्याचे दिसून येत आहे. आमदार रविंद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब आणि राजन साळवीनंतर आता अनिल देसाई यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांची ईडीकडून कसून चौकशी होणार आहे. दिनेश बोभाटे हे अनिल देसाई यांचे खाजगी स्वीय सहाय्यक असून ठाकरे गटाच्या समितीवर एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत त्यांच्याविरुद्ध सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर सुमारे अडीच कोटीची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे.
न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनीत वरिष्ठ पदावर असताना त्यांनी एप्रिल २०१४ ते जुलै २०२३ या कालावधीत ही बेहिशोबी मालमत्ता केली होती. ही संपत्ती त्यांच्या ज्ञात उत्पनापेक्षा ३६ टक्के जास्त आहे. सीबीआयच्या प्राथमिक तपासात ही बाब उघडकीस येताच त्यांच्यासह त्यांच्या पत्नीवर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला हातो. या घटनेला दोन महिने होत नाही तोवर ईडीने त्यांच्याविरुद्ध अन्य एका गुन्ह्यांची नोंद केली आहे. मनी लॉड्रिंग कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणात लवकरच त्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. दोन महिन्यांत केंद्रीय तपास यंत्रणेने दोन गुन्हे गुन्ह्यांची नोंद केल्याने दिनेश बोभाटे, खासदार अनिल देसाई यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे.