मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२४
मुंबई, – तडीपारची कारवाई सुरु असताना शहरात प्रवेश करुन कारवाईसाठी गेलेल्या पोलीस शिपायाला मारहाण करुन सरकारी काामत अडथळा आणल्याप्रकरणी अजय शालिग्राम निकम या आरोपीस नेहरुनगर पोलिसांनी अटक केली. अजय हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सातहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
स्वप्नील रमेश वानखेडे हे बदलापूर येथे राहत असून नेहरुनगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. शनिवारी रात्री उशिरा नेहरुनगर पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना तडीपारची कारवाई सुरु असताना अजय निकम नावाचा एक आरोपी वस्तलाताई नगर परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. त्यामुळे त्याला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने स्वप्नील वानखेडे यांच्या पोटात जोरात लाथ करुन त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीतही पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अजय निकमला स्वप्नील निकम यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अजयविरुद्ध पोलिसांवर हल्ला करुन शिवीगाळ करणे, धमकी देणे, मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासात अजय हा चेंबूरच्या तानसा पाईप लाईन, वस्तलाताई नाईक नगरचा रहिवाशी आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विक्रोळी आणि नेहरुनगर पोलीस ठाण्यात मारामारी, विनयभंग, गंभीर दुखापत करुन रॉबरी करणे, शिवीगाळ करुन धमकी देणे, एनडीपीएसच्या सातहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या वाढत्या कारवायाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याच्यावर दिड वर्षांसाठी नेहरुनगर पोलिसांनी तडीपारची कारवाई केली होती. ही कारवाई सुरु असताना त्याने तडीपारच्या नियमांचे उल्लघंन करुन गंभीर गुन्ह्यांच्या उद्देशाने मुंबई शहरात प्रवेश केला होता.