लग्नाच्या आमिषाने दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
विलेपार्ले-चेंबूरची घटना; दोन्ही आरोपींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑगस्ट २०२४
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने पंधरा व सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना विलेपार्ले आणि चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जुहू आणि आरसीएफ पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्ह्यांची नोंद केली आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
४५ वर्षांची तक्रारदार महिला चेंबूर येथे राहत असून तिला सतरा वर्षांची मुलगी आहे. याच परिसरात राहणार्या हर्ष नावाच्या एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४ या एका वर्षांत त्याने तिला त्याच्या चेंबूर येथील घरी आणले होते. तिथेच त्याने तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध दोन ते तीन वेळा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. अलीकडेच मेडीकल केल्यानंतर पिडीत मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच तिच्या आईने आरोपी हर्षविरुद्ध आरसीएफ पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३७६, ३७६ (२), (एन), ३६३ भादवी सहकलम ६, १० पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना विलेपार्ले परिसरात घडली. पिडीत मुलगी ही पंधरा वर्षांची असून ती विलेपार्ले परिसरात तिच्या कुटुंबियासोबत राहते. तिचा शुभम नावाचा एक मित्र असून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तिच्या राहत्या घरी लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. या घटनेनंतर तिने शुभमविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३७६ (२), (एन) भादवी सहकलम ४, ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.