मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पॉईट्स रेडीमच्या नावाने एका व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे सात लाखांची ऑनलाईन फसवणुक केली. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
५७ वर्षीय तक्रारदार धीरेन आनंदजी शाह यांचा शेअर मार्केटशी संबंधित व्यवसाय असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गावदेवी परिसरात राहतात. रविवारी सुट्टी असल्याने ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला होता. त्यात त्यांच्या बँकेचे ८९५०२ पॉईटसची मुदत संपणार असून ते पॉईंटस रेडीम करण्यास त्यांना सांगण्यात आले होते. या मॅसेजसोबत त्यांना एक लिंक पाठविण्यात आली होती. तयामुळे त्यांनी ती लिंक ओपन केली होती. बँकेचे पेज ओपन झाल्यानंतर त्यांना त्यांचे नाव, पॅनकार्ड, कस्टमर आयडी आणि पासवर्ड विचारण्यात आला होता. त्यांनी ही माहिती अपलोड करुन त्यांचे पॉईट्स रेडीम करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून दोन ऑनलाईन व्यवहार झाले होते. या व्यवहारानंतर त्यांना दोन बँकेकडून दोन मॅसेज प्राप्त झाले होते. त्यात त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख ९८ हजार आणि १ लाख ९९ हजार ५०० रुपये डेबीट झाल्याचे नमूद करण्यात आले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर टोल फ्री क्रमांक १९३० आणि गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर गावदेवी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.