प्लॉट विक्रीच्या बहाण्याने पोलीस अधिकार्याची फसवणुक
३.९० लाखांना गंडा घालणार्या मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – प्लॉट विक्रीच्या बहाण्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्याची एका भामट्याने फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंकुर ओमप्रकाश चक्रवर्ती या आरोपीविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. प्लॉटसाठी घेतलेल्या ३ लाख ९० हजार रुपयांचा अपहार करुन परस्पर प्लॉटची विक्री करुन अंकुरने संबंधित तक्रारदार अधिकार्याची फसवणुक केल्याचा आरोप आहे.
शंकर शिवाजी सावंत हे दादरच्या नायगाव पोलीस मुख्यालय वसाहतीत राहत असून मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. ताडदेव येथील सशस्त्र पोलीस विभाग दोनमध्ये त्यांची नियुक्ती असून त्यांना मुंबई उच्च न्यायालयात नेमणुकीस ठेवण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी त्यांना रायगड येथे एक प्लॉट खरेदी करायचा होता. त्यामुळे ते सोशल मिडीयावर अशा प्लॉटचा शोध घेत होते. काही व्हिडीओ पाहत असताना त्यांना एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक सापडला. त्यामुळे त्यांनी अंकुर चक्रवर्ती नावाच्या एका व्यक्तीला संपर्क साधला होता. यावेळी त्याने त्यांना रायगडच्या अलीबाग येथे तीन गुंठेचा एक मोकळ्या प्लॉटचा व्हिडीओ पाठविला होता. तो प्लॉट आवडल्याने त्यांनी तोच प्लॉट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये होती. यावेळी त्यांच्यात प्लॉट खरेदी-विक्रीचा एक करार झाला होता. त्यानंतर त्यांनी त्याला सुमारे चार लाख रुपये पाठवून दिले होते. उर्वरित एक लाख रुपये प्लॉटच्या रजिस्ट्रेशननंतर देण्याचे ठरले होते. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाले आणि त्यांच्यातील व्यवहार काही महिन्यांसाठी बंद झाला होता. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे प्लॉटच्या रजिस्ट्रेशनबाबत विचारणा केली, मात्र तो त्यांना आज-उद्या करुन टाळण्याचा प्रयत्न करत होता.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याचे सहाय्यक कांबळे आणि विकास यांच्याकडे विचारपूस केली होती. यावेळी या दोघांनी त्यांनी बुक केलेल्या प्लॉटची अंकुर चक्रवर्तीने परस्पर विक्री केल्याचे सांगितले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे प्लॉटसाठी दिलेल्या चार लाखांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने दहा हजार रुपये पाठवून उर्वरित तीन लाख नव्वद हजाराचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात अंकुर चक्रवर्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच अंकुरची पोलिसाकडून चौकशी होणार आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.