सोळा वर्षांच्या मुलीच्या गँगरेपप्रकरणी मुख्य आरोपीस शिक्षा
सर्व कलमांतर्गत २० वर्षांचा कारावासासह ५० हजाराचा दंडाची शिक्षा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑगस्ट २०२४
मुंबई, – सात वर्षापूर्वी बोरिवली परिसरात एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गॅगरेप केल्याप्रकरणी शाहरुख अलीमुल्ला शेख नावाच्या एका मुख्य आरोपीस दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने सर्व कलमांतर्गत दोषी ठरवून २० वर्षांच्या कारावासासह ५० हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम भरली नाहीतर त्याला आणखीन तीन महिने कारावास भोगावे लागणार आहे. निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांनी या गुन्ह्यांचा तपास करुन आरोपीविरुद्ध कोर्टात आरोपपत्र सादर केले होते.
पिडीत सोळा वर्षांची अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांसोबत बोरिवली परिसरात राहते. १७ डिसेंबर २०१७ रोजी रात्री आठ वाजता ती किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेली होती. यावेळी याच परिसरातील तीन तरुणांनी तिला पकडून एका रिक्षात आणले आणि तिच्यावर या तिघांनी आळीपाळून गॅगरेप केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी देऊन या तिघांनी तिची सुटका केली होती. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला होता. बदनामीच्या भीतीने त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र दुसर्या दिवशी तिच्या आईने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध ३७६ (डी), ५०६ (२) भादवी सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग वचकल यांच्याकडे सोपविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना बोरिवली परिसरातून पोलिसांनी अटक केली होती. त्यात शाहरुख शेखसह इतर दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. चौकशीत या तिघांनी पिडीत मुलीवर गॅगरेप करुन तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली दिली होती. त्यानंतर शाहरुखला अटक करुन इतर दोन्ही अल्पवयीन मुलांना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. याच गुन्ह्यांत सात वर्षांपासून शाहरुख हा न्यायालयीन कोठडी आहे. त्याला जामिन मिळू नये म्हणून पोलिसांनी विशेष प्रयत्न केले होते. तपास पूर्ण झाल्यानंतर शाहरुखविरुद्ध दिडोंशीतील पोक्सो कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते.
या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी न्या. डी. जी ढोबळे यांनी आरोपी शाहरुख शेखला भादवीसह पोक्सोच्या सर्वच कलमांतर्गत दोषी ठरवून २० वर्षांच्या सश्रम कारावासासह ५० हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम भरली नाहीतर त्याला आणखीन तीन महिने कारावास भोगावा लागला आहे. गॅगरेपचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना अटक करुन यातील मुख्य आरोपीस शिक्षा झाल्याने वरिष्ठांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्यासह कोर्ट कारकून व अन्य पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.