मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मानखुर्द येथील एका गोणीत महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह गोणी भरुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा ट्रॉम्बे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत मृत महिलेच्या पतीसह एकाच कुटुंबातील पाच आरोपींना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. मृत महिलेचे नाव रेश्मा कन्हैयालाल जयस्वाल (२१) असून तिच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये तिचा पती कन्हैयालाल भाईलाल जयस्वाल ऊर्फ लाला (२०), दिर अशोक भाईलाल जयस्वाल ऊर्फ चिंटू (२८), नंदोई रवि ऊर्फ प्रेमकुमार रामयालाल श्रीवास्तव (३२), नंदोईची आई मुन्नी रामयालाल श्रीवास्तव (५०) आणि नंदोईची बहिण रेश्मा रामयालाल श्रीवास्तव (२१) यांचा समावेश आहे. कौटुंबिक वादातून या पाचजणांनी रेश्माची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या पाचही आरोपींना रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.
मानखुर्दच्या महाराष्टनगर परिसरात मेट्रो दोन या मार्गाच्या कारशेडचे काम सुरु आहे. त्यामुळे तिथे खोदकाम करण्यात आले होते. खोदकामासाठी मातीचा ढिगारा जमा झालाह होता. शुक्रंवारी तिथे दुर्गंधी येत असल्याचे काहींच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली. यावेळी मातीच्या ढिगार्याजवळ एक गोणी पडली होती, याच गोणीत दुर्गंधी येत होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला देण्यात आली होती. कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गोणी उघडून पाहिल्यानंतर त्यात एका महिलेचा मृतदेह दिसून आला. प्राथमिक तपासात या महिलेची हत्या करुन तिच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका गोणीत भरुन तिथे टाकून मारेकर्यांनी पलायन केल्याचे उघडकीस आले होते. पंचनामा केल्यानंतर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. तिच्या अंगावर काही इमिटेशन ज्वेलरी होती. तिने अंगावर सलवार कुर्ता घातला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे तिची हत्या तीन ते चार दिवसांपूर्वीच झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
याप्रकरणी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दहा विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन मृत महिलेची ओळख पटली. तिचे नाव रेश्मा जयस्वाल असून ती मानखुर्दच्या महाराष्ट्रनगरात राहत होती. हाच धागा पकडून पोलिसांनी तिचा पती कन्हैयालाल ऊर्फ लाला जयस्वालसह दोन महिला आणि दोन पुरुष अशा एकाच कुटुंबातील पाचजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत त्यांनीच कट रचून ही हत्या केल्याचे उघडकीस आले. रेश्मा आणि कन्हैयालाल यांचा विवाह झाला होता. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. त्यातून त्यांनी तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणीत भरुन पुरावा नष्ट करण्यासाठी ती गोणी फेंकून पलायन केले होते, मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवून तिच्या हत्येत सहभागी असलेल्या पाचही आरोपींना मानखुर्दसह इतर ठिकाणाहून शिताफीने अटक केली.