जोगेश्वरीसह वांद्रे येथे दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत एका सहा वर्षांच्या मुलीसह सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर त्यांच्याच परिचित व्यक्तींनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना जोगेश्वरी आणि वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकणी ओशिवरा आणि बीकेसी पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी पिडीत मुलीचा नातेवाईक असल्याचे पोलिसंांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही दिडोंशीतील पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील सतरा वर्षांची पिडीत मुलगी जोगेश्वरी येथे राहत असून घरकाम करते. गेल्या काही महिन्यांपासून ती जोगेश्वरीतील एका पॉश अपार्टमेंटमध्ये घरकामासाठी जात होती. याच इमारतीत हसन हा सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर आली होती. यावेळी हसनने तिला इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील एका बाथरुममध्ये आणले. तिच्याशी अश्लील चाळे करुन त्याने तिचे कपडे काढून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिल्यानंतर त्याने तिला सोडून दिले होते. या घटनेने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र दुसर्या दिवशी तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी सुरक्षारक्षक हसन मुजुमदार याच्याविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना वांद्रे येथे घडली. २७ वर्षांची तक्रारदार महिला वांद्रे येथे राहते. सहा वर्षांची पिडीत तिची मुलगी तर आरोपी तिच्या नणंदेचा मुलगा आहे. गुरुवारी २२ ऑगस्टला सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास त्याने या मुलीला घराजवळील एका झाडाजवळ आणले होते. तिथे तिच्याशी जवळीक निर्माण करुन त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर तिच्यावर त्याने लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकारानंतर ही मुलगी प्रचंड घाबरली होती. यावेळी त्याने तिला घरी पाठविताना हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असा दम दिला होता. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन शुक्रवारी सायंकाळी आरोपीस अटक केली. याच गुन्ह्यांत दोन आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.