रेल्वे प्रवासादरम्यान कॉलेज तरुणीचा विनयभंग

गुन्हा दाखल होताच रेल्वेच्या अटेंडंटला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – सीएसएमटी-दादर प्रवासादरम्यान एका १९ वर्षांच्या कॉलेज तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच दिपक नावाच्या रेल्वेच्या अटेंडंटरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात जामिनावर सोडून दिले. या वृत्ताला विजय तायडे यांनी दुजोरा दिला आहे.

१९ वर्षांची तक्रारदार तरुणी संभाजीनगरची रहिवाशी असून ती कॉलेजमध्ये शिक्षण घेते. २१ फेब्रुवारीला तिच्या कॉलेजकडून मुंबईत एका दिवसांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ती तिच्या कॉलेज मित्रांसह शिक्षकासोबत मुंबईत आली होती. बुधवारी दिवसभर मुंबईत फिरल्यानंतर त्याच रात्री ते सर्वजण देवगिरी एक्सप्रेसमधून संभाजीनगरला जाण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी सीएसएमटी-दादर प्रवासादरम्यान रेल्वेचा अटेंडंट असलेल्या दिपकने तिच्याशी अश्‍लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याचा आरोप या तरुणीने केला होता. ही माहिती तिने तिच्या मित्रांना सांगितल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाईनवर घडलेला प्रकार सांगून दिपकविरुद्ध तक्रार केली होती.

नियंत्रण कक्षातून ही माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या पथकाने काही तासांत दिपकला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. संभाजीनगर येथे गेल्यानंतर तिने रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे दिपकविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद करुन त्याचा तपास सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला होता. गुन्ह्यांचे कागदपत्रे मिळाल्यानंतर दिपकला विनयभंगाच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page