आशिष शेलार यांच्या नावाने वकिलांची फसवणुक

गुन्हा दाखल होताच सराईत आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांच्या नावाने वकिलांची फसवणुक करणार्‍या एका सराईत आरोपीस वांद्रे पोलिसांनी अटक केली. मोहम्मद आमीर बेद्रेकर असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद आमीरने शर्मा नाव सांगून काही वकिलांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

नवनाथ पोपट सातपुते हे वांद्रे येथे राहत असून मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांचे खाजगी स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात. तीन दिवसांपूर्वी ते त्यांच्या कार्यालयात होते. यावेळी त्यांना विजेंद्र राय, यास्मिन वानखेडे यांनी फोनवरुन माहिती दिली की त्यांच्या परिचित इरम सय्यद, रईस खान आणि आफरीन या वकिलांना जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधत शर्मा नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने तो आशिष शेलार यांचा पीए आणि मंत्रालयीन सेके्रटरी असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील बहुतांश कारागृहात बंदी असलेल्या आरोपींची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकार त्यातील काही आरोपींना मुक्त करण्यासाठी विशेष योजना बनवत आहेत. त्यासाठी सत्र आणि मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या आरोपींची केसेसची, आरोपींची व त्यांच्या नातेवाईकांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने हुबेहुब आशिष शेलार यांचा आवाज काढून ते आशिष शेलार बोलत असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संबंधित वकिलांनी त्याला काही आरोपींची माहिती दिली होती. याच दरम्यान त्याने कारागृहात बंद असलेल्या त्याचा नातेवाईक कारागृहात पडून जखमी झाला आहे. त्याला पैशांची गरज असल्याचे सांगून आफरीन या वकिलाकडून आठ हजार रुपये घेतले होते.

अशा प्रकारे शर्माने इतर काही वकिलांना संपर्क साधला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करण्याची विनंती केली होती. त्यानंतर नवनाथ सातपुते यांनी आशिष शेलार यांना ही माहिती दिली होती. त्यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी वांद्रे पोलिसांत शर्मा नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध ३१८ (४), ३१९ (२), ३५६ (२), २०४ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाची माहिती काढून मोहम्मद आमीर याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच आशिष शेलार यांच्या नावाचा गैरवापर करुन काही वकिलांना संपर्क साधून त्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात मोहम्मद आामीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे बोलले जाते. त्याच्या चौकशीतून अशाच इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page