पश्चिम रेल्वेच्या कार्यालय अधिक्षकाला ५० हजाराच्या लाचप्रकरणी अटक
बिल मंजूरीसाठी लाचेची मागणी; सीबीआयच्या एसीबीची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – पश्चिम रेल्वेच्या मुख्य कार्यालयातील अधिक्षकालाच ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. साहित्य पुरवठा करणार्या एका खाजगी कंपनीचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. कारवाईनंतर दोन ठिकाणी या अधिकार्यांनी झडती घेऊन काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केल्याचे सांगितले. अटकेनंतर त्याला विशेष स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.
तक्रारदार एका खाजगी कंपनीतील अधिकारी असून त्यांची कंपनी रेल्वेला साहित्य पुरविण्याचे काम करते. कंपनीला रेल्वेला ४ कोटी ८० लाख रुपयांचे पेमेंट येणे बाकी होते. या पेमेंटसाठी कंपनीकडून सतत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात होता. यासंदर्भात त्यांनी पश्चिम रेल्वेच्या मुख्य कार्यालयातील अधिक्षकांची भेट घेतली होती. यावेळी बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे ५० हजाराची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अधिक्षकाविरुद्ध केंद्रीय गुप्तचर विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या अधिकार्यांनी मुख्य कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेताना अधिक्षकाला या अधिकार्यांनी रंगेहाथ अटक केली. लाचेनंतर या अघिकार्यांनी दोन ठिकाणी कारवाई केली होती. या कारवाईत काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आले असून त्याची सध्या शहानिशा सुरु आहे. रेल्वेच्या अधिक्षकाला लाचप्रकरणी अटक झाल्याने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.