मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका कारच्या धडकेने राजू जगदीश गुप्ता या ४८ वर्षांच्या पादचार्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या चालकाचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. हा अपघात शनिवारी सकाळी सात वाजता वांद्रे येथील वांद्रे-वरळी सी लिंक, यु ब्रिजखाली झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
रेश्मा कदीम कुरेशी ही महिला वांद्रे येथील रंगशारदा हॉटेल, नर्गिस दत्त नगरात राहत असून तिच्या पतीचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तीस वर्षांपूर्वी तिच्या आईने आरिफ खान या व्यक्तीशी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले होते. तिचा मृत राजू गुप्ता हा भाऊ असून अविवाहीत आहे. बहिणीवगळता त्याचे कोणी नातेवाईक नाही. त्यामुळे तो त्यांच्यासोबत राहत होता. दिवसभर फिरुन तो भंगार गोळा करण्याचे काम करत होता. शनिवारी सकाळी पाच वाजता तो नेहमीप्रमाणे त्याच्या कामावर निघून गेला होता. सकाळी साडेसात वाजता तिच्या पतीला एक कॉल आला होता, यावेळी समोरील व्यक्तीने राजू गुप्ता यांचा अपघात झाला असून त्याला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे रेश्मासह इतर सर्व नातेवाईक भाभा हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांना राजू गुप्ता याला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समजले. चौकशीदरम्यान राजू हा वांद्रे-वरळी सी लिंकवरुन जात आता होता. यावेळी यु ब्रिजखाली एका भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.
अपघातानंतर चालक त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. ही माहिती प्राप्त होताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या राजूला जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रेश्मा कुरेशी हिच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून तिच्या मामाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.