क्षुल्लक वादातून दोन घटनेत चौघांवर प्राणघातक हल्ला
वांद्रे-शिवडीतील घटना; दोन्ही आरोपींना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – क्षुल्लक वादातून दोन वेगवेगळ्या घटनेत चौघांवर त्यांच्याच परिचित आरोपींनी कोयत्यासह चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वांद्रे आणि शिवडी परिसरात घडली. याप्रकरणी शिवडी आणि खेरवाडी पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली. किसन हरिद्वार राव आणि थेनपांडी गणपतीराज तंबी नाडर अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिली घटना रविवारी रात्री उशिरा दोन वाजता शिवडीतील दारुखाना, देवीदयाळ कंपाऊंड गेट क्रमांक दोनमध्ये घडली. दिपक जवाहर गौड हा याच परिसरात राहत असून मजुरीचे काम करतो. हरिद्वार गौड हा त्याचा मामा असून तो त्याच्यासोबत राहतो. काही दिवसांपूर्वी आरोपी किसन याचे दिपकच्या वडिलांसोबत झोपण्याच्या जागेवरुन वाद झाला होता. त्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून रविवारी रात्री उशिरा किसनने दिपकसह त्याचा मामेभाऊ हरिद्वार यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल केला होता. त्यात दिपकच्या डोक्याला, मनगटाला, पाठील, हाताच्या खांद्याला, कंबरेला आणि कानाजवळ तर मामेभाऊ हरिद्वार याच्या नाकाला, डोक्याला आणि बोटाला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर किसन हा पळून गेला होता. जखमी झालेल्या दोघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या किसन राव याला अटक केली. तो सुतार असून जखमींच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसरी घटना शनिवारी रात्री पावणेदोन वाजता वांद्रे येथील शासकीय वसाहत, पाटील वडापाव सेंटर, राजधानी बेकरीसमोर घडली. याच परिसरात अभिषेक गोपाल रंजक हे राहत असून त्यांचा ऍम्ब्युलन्स सर्व्हिसचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे रामसरोज, ऋषिकेश आणि थेनपांडी हे कामाला आहे. काही दिवसांपूर्वी कामावरुन थेनपांडी आणि रामसरोज यांच्यात वाद झाला होता. शनिवारी रात्री पावणेदोन वाजता त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आले. यावेळी थेनपांडीने रामसरोजला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. त्यात त्याच्या छातीला दुखू लागल्याने ऋषिकेशने त्याला ऍम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने थेनपांडीने या दोघांवर चाकूने चार केले होते. रामसरोजच्या पोटाला तर ऋषिकेशच्या बरगडी, खाद्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांनाही नंतर व्ही. एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अभिषेक रंजक यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी थेनपांडीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी कर्मचार्याला पोलिसांनी अटक केली.