सतरा वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
पवई, मालाड व अंधेरीतील घटना; तिन्ही आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – सतरा वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलीवर त्यांच्याच परिचितांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना पवई, मालाड आणि अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पवई, कुरार आणि डी. एन नगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील एका गुन्ह्यांत भावोजीनेच तिच्या सतरा वर्षांच्या अल्पवयीन मेहुणीवर लैगिंक अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार मुलगी पवई येथे राहत असून आरोपी तिच्याच चाळीत राहतो. १ मार्चला त्याने तिला त्याच्या घरी बोलाविले होते. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. २५ ऑगस्टला त्याने तिला पुन्हा त्याच्या घरी बोलाविले होते. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ केली होती. घडलेला प्रकार तिने पवई पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध ६४ (१), ७८, ३५१ (३), ३५२ भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत सोमवारी २५ वर्षांच्या आरोपीस पवई पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना मालाड येथे घडली. ५० वर्षांची तक्रारदार महिला सांताक्रुज येथे राहत असून तिला सतरा वर्षांची मुलगी आहे. तिची एक मुलगी विवाहीत असून ती तिच्या कुटुंबियांसोबत मालाड येथे राहते. १७ ऑगस्टला तिची अल्पवयीन मुलगी तिच्या बहिणीकडे गेली होती. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून १७ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत तिच्यावर तिच्याच जावयाने लैगिंक अत्याचार केला. ही माहिती कोणालाही सांगितली तर तिच्या बहिणीसह आई-वडिलांना जिवे मारण्याची तसेच तिच्यापासून फारकत घेण्याची धमकी दिली होती. घडलेला प्रकार सोमवारी तिने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर या महिलेने कुरार पोलिसांत जावयाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३५२, ६४ (१), ६४ (२), (एफ), ६४ (२), (एम), ६५ (१) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच २४ वर्षांच्या जावयाला कुरार पोलिसांनी अटक केली.
तिसरी घटना अंधेरीतील गावदेवी डोंगर परिसरात घडली. पिडीत मुलगी ही अंधेरी येथे राहत असून तिचे २३ वर्षांच्या आरोपीशी प्रेमसंबंध होते. नोव्हेंबर २०२३ रोजी लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिच्या घरी राहत असताना तो तिच्यावर सतत लैगिंक अत्याचार करत होता. नंतर तो तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला होता. त्यानंतर तिने डी. एन नगर पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सोमवारी आरोपी स्वतहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिन्ही आरोपींना दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.