भरवेगात जाणार्‍या टँकरच्या धडकेने पादचार्‍याचा मृत्यू

दहिसर येथील घटना; आरोपी चालकास अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका टँकरच्या धडकेने एका ४५ ते ५० वयोगटातील पादचार्‍याचा मृत्यू झाला. मृत पादचार्‍याची ओळख पटली नसून त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी चालक राजदिप भिकुभाई धादल याला अटक केली आहे. तो मूळचा गुजरातच्या अमरेली, मालसिकाच्या पोथारीचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने जामिनावर सोडून दिले.

हा अपघात सोमवारी दुपारी पाऊणच्या सुमारास दहिसर येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चिरंजीवी बार ऍण्ड रेस्ट्रॉरंटसमोर झाला. सोमवारी दुपारी दहिसर येथे अपघात झाला असून पोलीस हवी आहे असा कॉल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्राप्त झाला होता. ही माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक पादचारी जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याला कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्ष आहे. रस्ता क्रॉस करताना त्याला मिरारोडच्या दिशेने भरवेगात जाणार्‍या एका टँकरने धडक दिली होती. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेश चंद्रकांत सुरवसे यांच्या तक्रारीवरुन वाहनचालक राजदिप धादल याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून एका पादचार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page