मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – चालू महिन्यांत शिवडी आणि मालवणी परिसरात जन्मदात्या पित्यानेच त्यांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना मुंबई शहरात अशाच एका माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मालाडच्या दिडोंशीच्या हद्दीत एका नऊ वर्षांच्या मुलीवर तिच्याच पित्याने लैगिंक अत्याचार केले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन ३० वर्षांच्या आरोपी पित्याविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आता अल्पवयीन मुली स्वतच्या घरातच सुरक्षित नसल्याचे गेल्या काही घटनांवरुन दिसून येत आहे.
ऑगस्ट महिन्यांत शिवडी आणि मालवणी परिसरात जन्मदात्या पित्यानेच त्यांच्या अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केला होता. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल होताच आरोपी पित्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या दोन्ही घटना ताज्या असताना आता मालाड परिसरात अन्य एका गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २५ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पती आणि नऊ वर्षांच्या मुलीसोबत मालाड परिसरात राहते. जून महिन्यांत घरात कोणीही नसताना तिच्या पतीने त्यांच्याच नऊ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असा दम दिला होता. त्यानंतर त्याने अनेकदा स्वतच्या मुलीवर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. जून महिन्यांपासून हा प्रकार सुरुच होता. अलीकडेच या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. पित्याकडूनच मुलीवर लैगिंक अत्याचार सुरु असल्याची माहिती समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने सोमवारी रात्री उशिरा दिडोंशी पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ६५ (२), ६८ (अ) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, १०, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. रात्री उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची उसळली होती.