भारतीय नेमबाजी संघाच्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घरफोडी
ऑलिम्पिक स्पर्धेनंतर मुंबईत आल्यानंतर प्रकार उघडकीस आला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२४
मुंबई, – भारतीय नेमबाजी संघाच्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने क्लिनिकमध्ये प्रवेश करुन आतील पाच लाख तेरा हजार रुपयांचा इंटेरियर साहित्य चोरी करुन पलायन केले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत क्लिनिकच्या जागेच्या मालकासह त्याचा कारचालक आणि सोसायटीच्या सिक्युरिटी गार्डची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.
स्वप्निल परमेश्वर माटे हे व्यवसायाने डॉक्टर असून ते वांद्रे तर त्यांचे कुटुंबिय कल्याण येथे राहतात. त्यांचे एक खाजगी क्लिनिक असून ते भारतीय नेमबाजीच्या राष्ट्रीय संघाच्या वैद्यकीय टिममध्ये काम करतात. त्याच संदर्भात ते स्पोर्टस मेडिसीनचे क्लिनिक चालवितात. त्यांना वांद्रे येथील कक्कड निवासमध्ये एक क्लिनिक सुरु करायचे होते. त्यामुळे त्यांनी सप्टेंबर २०२३ रोजी निरज कक्कड यांच्याकडून क्लिनिकसाठी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. या ठिकाणी त्यांनी इंटेरियरचे काम सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी पाच लाख तेरा हजार रुपयांचे सामान आणून क्लिनिकमध्ये ठेवले होते. याच दरम्यान त्यांचे निरज कक्कड यांच्याशी वाद झाला आणि त्यांना त्यांच्या क्लिनिकच्या इंटेरियरचे काम पूर्ण करता आले नाही. १० जुलै २०२४ रोजी ते भारतीय नेमबाजी संघासोबत पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पोर्टस मेडिसीन डॉक्टर म्हणून गेले होते. त्यामुळे त्यांनी क्लिनिकमधील सामान कुलूप लावून ती चावी सिक्युरिटी गार्डकडे दिली होती. ऑगस्टमध्ये ते पॅरिस येथून मुंबईत आले होते. त्यानंतर सोमवारी २६ ऑगस्टला ते त्यांच्या क्लिनिकमध्ये गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या फ्लॅटचे लॅच तुटलेले दिसून आले. दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी फ्लॅटची डोअर बेल वाजविली. यावेळी एका एका अज्ञात व्यक्तीने दरवाजा उघडला. त्याने तो निरज ठक्कर यांचा चालक होता. त्याने त्यांना फ्लॅटमध्ये येण्यास मनाई करुन तेथून जाण्यास सांगितले.
या घटनेनंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली. कंट्रोल रुममधून माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी त्यांनी पोलिसांसमोरच फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता त्यांच्या क्लिनिकसाठी आणलेले सर्व इंटेरियर सामान चोरीस गेल्याचे दिसून आले. ते साहित्य निरज कक्कर याचा चालक अथवा अज्ञात व्यक्तीने फ्लॅटमध्ये प्रवेश करुन चोरी केल्याची खात्री होताच त्यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.