मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२४
मुंबई, – कांदिवलीतल एका खाजगी शाळेत दुपारच्या वेळेस पीटी तासादरम्यान वर्गमित्रांसोबत खेळताना एका आठ वर्षांच्या शाळकरी मुलाच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. शिवांग मनोज झा असे या मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर शिवांगच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान दुपारी घडलेल्या या घटनेने शाळेतील शिक्षकासह पालक आणि इतर विद्यार्थ्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
झा कुटुंबिय कांदिवलीतील पोईसर परिसरात राहतात. आठ वर्षांचा शिवांग हा याच परिसरातील एका खाजगी शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होता. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. दुपारच्या सत्रात त्याची पीटीचा तास होता. त्यामुळे तो त्याच्या वर्गमित्रासोबत मॅटवर लगंडी खेळत होता. यावेळी अचानक त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. त्याची काहीच हालचाल नव्हती. त्यामुळे त्याच्यासोबत खेळणार्या मुलांनी शाळेतील शिक्षकांना ही माहिती सांगितली. या माहितीनंतर या शिक्षकांनी त्याला जवळच्या श्रीजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही माहिती नंतर शाळेने समतानगर पोलिसांसह शिवांगच्या पालकांना कळविली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शिवांगचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. शाळेतील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवांगसोबत खेळणार्या मित्रांसह शिक्षकांची पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली आहे. खेळता-खेळता शिवांग अचानक बेशुद्ध झाला आणि जमिनीवर पडला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूबाबत अधिकृत सांगता येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याच प्रकरणात शिवांगच्या पालकांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. दरम्यान शाळेतच एका आठ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने शाळेतील शिक्षकासह पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.