मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – बोगस ड्रग्जच्या गुन्ह्यांत चौकशीसाठी ताब्यात घेऊन संबंधित व्यक्तीला अडकाविण्याचा प्रयत्न करणे खार पोलीस ठाण्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन अंमलदारांना चांगलेच महागात पडले आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित चारही पोलिसांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. एकाच वेळेस चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार डॅनियल हा कालिना येथील एका मोकळ्या मैदानात असलेल्या गोठयामध्ये काम करतो. ३० ऑगस्टला सायंकाळी पावणेसहा वाजता तो रस्त्यावरुन जात होता. यावेळी त्याला चार पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या खिशात वीस ग्रॅम एमडी ड्रग्ज ठेवून त्याला एमडी ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथे असलेल्या एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. डॅनियलला ड्रग्जच्या गुन्ह्यांत संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र त्यात तथ्य नसल्याचे दिसून आल्यानंतर त्याला सोडून दिल्याचे सांगितले. मात्र सीसीटिव्ही फुटेजमध्ये एका पोलीस त्याच्या खिशात ड्रग्ज ठेवत असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या बेकायदेशीर कृत्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून गंभीर दखल घेत घेण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यात एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस अंमलदाराचा समावेश होता. ते चौघेही खार पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहेत.
डॅनियलला खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्यानंतर या चारही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. या चौकशीत ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डॅनियलने पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याचा प्रयत्न करुन त्याला अटकेची धमकी दिली होती. मात्र सीसीटिव्ही फुटेजमुळे त्यांचे बिंग फुटले. जमिनीच्या वादातून त्याला एका बिल्डरच्या मदतीने टार्गेट करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या बिल्डरची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.