विवाहीत प्रियकराच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीवर गुन्हा दाखल
मानसिक शोषण करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – विवाहीत प्रियकराच्या आत्महत्येप्रकरणी २९ वर्षांच्या प्रेयसीविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रवी रामरथी यादव असे या ४७ वर्षीय प्रियकराचे नाव असून प्रेयसीचे नाव एकता श्रीमाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. मानसिक शोषण करुन रवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा एकतावर आरोप आहे. याच गुन्ह्यांत तिला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. जून महिन्यांत रवीने एकताच्या गोरेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
कल्याण-डोबिवली महानगरपालिकेतून निवृत्त झालेले ७५ वर्षांचे तक्रारदार रामरथी बालादिन यादव हे डोबिवली येथे त्यांच्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांचा रवी हा मुलगा असून त्याची पत्नी आणि दोन मुले त्यांच्यासोबत राहतात. रवी हा एका खाजगी कंपनीत नोकरीस होता. त्याला स्वतचा औषध बनविण्याचा कारखाना सुरु करायचा होता. त्यासाठी त्याने तळोजा येथे काम सुरु केले होते. गेल्या काही दिवसांपासून रवी हा प्रचंड मानसिक तणावात होता. त्याचे गोरेगाव येथील प्रेमनगर, म्हाडा कॉलनीत राहणार्या एकता या २९ वर्षांच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून याच प्रेमसंबंधावरुन त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. तिच्यामुळेच तो सतत मानसिक तणावात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. २४ जूनला तो रात्री घरातून कंपनीचे महत्त्वाचे काम असल्याचे सांगून घरातून निघून गेला. रात्री बारा वाजता त्यांच्या नातूच्या मोबाईलवर एकताचा फोन आला होता. यावेळी तिने रवी हा तिच्या घरी आला होता. काही वेळानंतर तो बेडरुममध्ये गेला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अशी माहिती सांगितली. ही माहिती ऐकून यादव कुटुंबियांना धक्काच बसला होता. त्यामुळे ते सर्वजण गोरेगाव येथील एकताच्या घरी गेले होते. तिथे त्यांना रवी बेडरुमवर बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. यावेळी एकताने रवीने घरात आत्महत्या केली होती. त्याला खाली काढताना तो पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगितले.
ही माहिती समजताच गोरेगाव पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली होती. रवीला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्याच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नव्हती. त्यामुळे त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. याच प्रकरणात रवीचे वडिल रामरथी यादव यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्यांनी एकता ही रवीचा मानसिक शोषण करत होती. त्यामुळे तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. आत्महत्येच्या दिवशीही तिच्यासोबत रवीचे भांडण झाले होते. कामासाठी जातो असे सांगून रवी हा तिच्या घरी गेला आणि त्याने तिच्या राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यामुळे रवीच्या आत्महत्येला एकता हीच जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यांनी तिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एकता श्रीमाली हिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच तिची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.