गोरेगाव व चेंबूर येथील अपघातात सहा तरुणांचा मृत्यू

जखमी तिघांवर उपचार सुरु; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गोरेगाव आणि चेंबूर येथील दोन वेगवेगळ्या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीररीत्या जखमी झाले. जखमींवर जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी आरसीएफ आणि आरे पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. यातील बाईकस्वाराचा मृत्यू झाला तर दुसर्‍या गुन्ह्यांतील कारचालकावर उपचार सुरु आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.

चेंबूर अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये हरिश्‍चंदन दिलीस दास, प्रमोद शंकर प्रसाद आणि हुसैन शेख यांचा तर जखमींमध्ये चालक जावेद सैफला खान, मनोज मनी करंटम आणि संजय सुखर सिंग यांचा समावेश आहे. हा अपघात १ सप्टेंबरला रविवारी दुपारी पावणेदोन वाजता चेंबूर येथील गव्हाणपाडाकडून वाशीनाकाच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर झाला. मृत आणि जखमी लक्ष्मीनगरातील एकाच परिसरात रहिवाशी राहत असून मित्र आहेत. रविवारी दुपारी ते सर्वजण जावेदच्या क्वालिस कारमधून गव्हाणपाडा येथून वाशीनाकाच्या दिशेने येत होते. यावेळी भरवेगात कार चालविताना जावेदचा कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पलटी होऊन जवळच उभ्या असलेल्या एका टँकरवर आदळली. या अपघातात सहाजण गंभीररीत्या जखमी झाले होते. ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या सहाजणांना राजावाडीसह शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यातील प्रमोद हा मूळचा बिहारचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमीवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी कारचालक जावेदविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

दुसरा अपघात गोरेगाव येथील आरे कॉलनीजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात राधेश्याम दावंडे या बाईकस्वारासह त्याचे दोन मित्र विवेक राजभर आणि रितेश साळवे यांचा मृत्यू झाला. तिन्ही तरुण गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात राहत होते. शुक्रवारी रात्री उशिरा ते तिघेही त्यांच्या बाईकवरुन आरे कॉलनीहून गोरेगावच्या दिशेने जात होते. यावेळी राधेश्याम हा बाईक चालवत होता तर त्याचे दोन्ही मित्र विवेक आणि रितेश मागे बसले होते. भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात त्याचा बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने एका विजेचा खांब्याला जोरात धडक दिली होती. या अपघातात ते तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी तिघांनाही जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी राधेश्याम आणि विवेकला मृत घोषित केले तर रितेशवर तिथे उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही नंतर मृत्यू झाला. राधेश्याम हा बाईक चालवत होता, त्यामुळे हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतसह इतर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध आरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page