मालाडच्या हॉटेलच्या कोल्ड कॉफीमध्ये सापडले झुरळ

मॅनेजर, वेटरसह इतर कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मालाड परिसरातील एका हॉटेलमध्ये देण्यात आलेल्या कोल्ड कॉफीमध्ये झुरळ सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी मालाड पोलिसांनी होप ऍण्ड शाईन लाऊंज हॉटेलचे मॅनेजर, वेटर आणि इतर कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच हॉटेलच्या सर्व कर्मचार्‍यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. आईस्क्रिममध्ये मानवी बोटानंतर आता कॉफीमध्ये झुरळ सापडल्याने त्याची पोलिसांकडून गंभीर घेण्यात आली आहे.

प्रतिक गिरीश रावत हा २५ वर्षांचा तरुण अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहतो. त्याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता तो त्याचा मित्र गणेश मनोहर केकानसोबत मालाड येथील लिंक रोड, सॉलिटर इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर असलेल्या होप ऍण्ड शाईन लाऊंज हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी या दोघांनी कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली होती. काही वेळानंतर वेटरने त्यांना दोन काचेच्या ग्लासमधून कोल्ड कॉफी आणून दिली. टेस्ट घेतल्यानंतर ती कॉफी त्यांना कडवट लागली. त्यामुळे त्यांन वेटरला सांगून कॉफीमध्ये स्वीट टाकण्यास सांगितले. त्यानंतर तो वेटर कॉफीमध्ये स्वीट टाकून परत आला होता. कॉफी पिताना त्यांना आतमध्ये काहीतरी असल्याचे जाणवले. बारकाईने पाहणी केल्यानंतर एका ग्लासमधील कॉफीमध्ये झुरळ असल्याचे दिसनू आले. त्यामुळे त्यांनी वेटरसह मॅनेजरला हा प्रकार सांगून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी कॉफीमधील झुरळाचे फोटो काढून घेतले होते. काही वेळानंतर हॉटेलचा मालक तिथे आला आणि त्याने त्यांना किचनमध्ये नेले. ज्या शेकमध्ये कॉफी बनविली जाते, त्यात झुरळ जाऊ शकत नाही असे सांगून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला.

याच दरम्यान त्यांनी झुरळ बेसीनमधून टाकून पाण्याचा नळ सुरु केल्याने ते झुरळ पाण्यातून वाहून गेले. मात्र त्याने झुरळ असल्याचा फोटो आधीच काढून ठेवला होता. घडलेल्या प्रकारानंतर त्याने नंतर मालाड पोलिसांना सांगून हॉटेलच्या मॅनेजरसह वेटर आणि इतर कर्मचार्‍याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित सर्वांविरुद्ध पोलिसांनी १२५, २७४, २७५, ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच संबंधित सर्व कर्मचार्‍यांची पोलिसाकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. मालाड येथे काही दिवसांपूर्वी आईस्क्रिममध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची घटना ताजी असताना आता कॉफीमध्ये झुरळ सापडल्याने त्याची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page