अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन खंडणीची मागणी
लैगिंक अत्याचारासह खंडणीप्रकरणी आरोपी मित्राला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – लैगिंक अत्याचाराचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका सतरा वर्षांच्या मुलीकडे पंधरा हजाराची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आफ्ताक नावाच्या एका २० वर्षांच्या तरुणाला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार, खंडणीसाठी धमकी देणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१७ वर्षांची पिडीत मुलगी विलेपार्ले येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. आरोपी आफ्ताब हा तिचा मित्र असून ते दोघेही एकाच शाळेत शिकत होते. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. ६ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत त्याने तिच्यावर तिच्या राहत्या घरी येऊन तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे त्याने मोबाईलवरुन रेकॉडिंग केले होते. ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्याकडे पंधरा हजार रुपयांची मागणी करत होता. पैसे दिले नाहीतर तिची बदनामीची तो तिला सतत धमकी देत होता. या धमकीनंतर ती प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार विलेपार्ले पोलिसांना सांगितला. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश विलेपार्ले पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ७४, ३०८ (३०), ६४, ६४ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
यावेळी पोलिसांनी तिला संपर्क साधून त्याला पैसे घेण्यासाठी चकाला येथे बोलाविले होते. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता आफ्ताब हा पैसे घेण्यासाठी तिथे आला होता. यावेळी तिथे आधीच पाळत ठेवलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात या दोघांचे अश्लील व्हिडीओ असल्याचे दिसून आले आहे.