मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गांजा विकण्यास विरोध केला म्हणून चारजणांच्या एका टोळीने मनोजकुमार नेणार नाडार या तरुणावर चाकूसह बॅट आणि दगडाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या मनोजकुमारवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आशिष, मेहताबसह इतर दोघांविरुद्ध धारावी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. चारही मारेकरी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
विवेककुमार नाडार हा कुरिअर बॉय असून तो धारावीतील रजबअली चाळीत राहतो. जखमी मनोजकुमार हा त्याचा भाऊ आहे. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात काही तरुण गांजाची विक्री करत होते. हा प्रकार मनोजकुमारच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणांना परिसरात गांजा विक्री करण्यास विरोध केला होता. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर चौघांनी मनोजवर चाकूसह बॅट आणि दगडाने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हल्ल्यानंतर चारही आरोपी तेथून पळून गेले होते. जखमी झालेल्या मनोजकुमारला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी विवेककुमारची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या चारही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चौघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.