बोगस धनादेशाद्वारे शासकीय पैशांवर सातजणांकडून डल्ला
महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या खात्यात गैरव्यवहार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बोगस धनादेशाद्वारे शासकीय पैशांवर उत्तरप्रदेशातील सातजणांच्या टोळीने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार जी. टी हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या बँक खात्यातून ९ लाख ८७ हजार ६२७ रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर हॉस्पिटलच्या वतीने आझाद मैदान पोलिसांत तक्रार करण्यात आलीद आहे. या तक्रारीनंतर निहाल, विनोद यादव, अंजुम तारा, वरुण यादव शशांककुमार, रोहित राज व अन्य एका आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
भालचंद्र गोपीनाथ चिखलकर हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांच्या कुटुंबियांसोबत परळ परिसरात राहतात. जून २०२० पासून ते जीटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गरजू आणि गरीब लोकांसाठी महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना हॉस्पिटलमध्ये लागू असून ते स्वत अशा रुग्णांना मोफत उपचार मिळतील यासाठी प्रयत्न करतात. या रुग्णांचे रेशनकार्ड, आधाकार्ड आणि कागदपत्रे मंजुरीसाठी शासनाकडे पाठवून ती मंजुर करुन घेणे, मंजूर झालेल्या प्रकरणात पात्र रुग्णांवर सर्व उपचार मोफत करुन देणे याची सर्व जबाबदारी ते पाहतात. शासनाकडून आलेला निधी संबंधित योजनेच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर ती रक्कम रुग्णाच्या उपचारावर खर्च केला जात होता. ९ ऑगस्टला या विभागाचे डेटा एंट्रीचे काम पाहणारे कर्मचारी किशोर भगवान गोलीपकर यांना त्यांच्या विभागाचया बँक खात्याची पाहणी केल्यानंतर डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत काही गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी बँक खात्यातील सर्व डेबीट आणि क्रेडिट हिशोबाची पाहणी केली होती. यावेळी त्यांना त्यांच्या बँक खात्याच्या दहाहून बोगस धनादेश आणि स्वाक्षरी करुन खात्यातून २३ लाख २९ हजार ११५ रुपये डेबीट झाले होते. विशेष म्हणजे त्याच क्रमांकाच्या धनादेशावर पुन्हा ९ लाख ८७ हजार ६२७ रुपये सात विविध बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले होते. चौकशीअंती ही रक्कम निहाल, विनोद यादव, अंजुम तारा, वरुण यादव शशांककुमार, रोहित राज व अन्य एका आरोपींच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले होते.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बँकेत संपर्क साधून विचारणा केली होती. संबंधित धनादेशची पाहणी केली असता ते सर्व धनादेश बोगस होती. त्यात भालचंद्र चिखलकर यांची स्वाक्षरी बोगस होती. संबंधित आरोपींनी बँक खात्यातील धनादेशाची माहिती काढून बोगस धनादेश तयार करुन ही रक्कम ट्रान्स्फर करुन संबंधित विभागाची फसवणुक केली होती. हा प्रकार भालचंद्र चिखलकर यांनी आझाद मैदान पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सातही आरोपीविरुद्ध पोलिसांनी ४२०, ४६५ ४६७, ४६८, ४७१, ४७४, १२० बी, ३४ भारतीय दंड सहिता गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंतच्या चौकशीत सातही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून हा संपूर्ण गैरव्यवहार उत्तरप्रदेशातून झाल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल झाल्याने आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून लवकरच एक टिम उत्तरप्रदेशाला चौकशीसाठी जाणार आहे.