अल्पवयीन बहिणींचा रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून विनयभंग
विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल होताच अटकेची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – पंधरा आणि तेरा वर्षांच्या दोन अल्पवयीन बहिणीचा पाठलाग करुन त्यांच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन ३३ वर्षांच्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली आहे. नूरमोहम्मद मोहम्मद गौस शेख असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध आरसीएफ पोलीस ठाण्यात चारहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दहा हजाराच्या लायक जामिनदारासह त्याला एक वर्षासाठी परिसरात शांतता राखण्याचे बंधपत्र घेण्यात आले होते. तरीही त्याने या दोन्ही बहिणीचा विनयभंग केल्याने त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.
३२ वर्षांची तक्रारदार महिला ही चेंबूर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला पंधरा आणि तेरा वर्षांच्या दोन मुली आहेत. याच परिसरात नूरमोहम्मद हा राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. ३० ऑगस्टला तिच्या पंधरा वर्षांच्या मुलीचा दोनदा नूरमोहम्मदने पाठलाग करुन तिच्याशी अश्लील नजरेने पाहून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष केले होते. ही घटना ताजी असताना दुसर्या दिवशी त्याने महिलेच्या तेरा वर्षांच्या मुलीचा पाठलाग केला होता. तिला पाठीमागून जोरात मिठी मारुन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ही मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने तेथून पलायन केले होते. यावेळी तिला उद्देशून नूरमोहम्मदने कभी तो मेरे हात मे आयेगी तब देख लूंगा अशी धमकी दिली होती. या दोन्ही घटनेनंतर या मुलींनी तिच्या आईला हा प्रकार सांगितला. सलग दोन दिवस नूरमोहम्मदकडून तिच्या दोन अल्पवयीन मुलींचा पाठलाग करुन त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचा विनयभंग केला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार आरसीएफ पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर नूरमोहम्मदविरुद्ध पोलिसांनी ७४, ७८, ३५१ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ८ १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत रविवारी रात्री उशिरा त्याला चेंबूर येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. नूरमोहम्मद हा याच परिसरात राहत असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध रॉबरीसह गंभीर दुखापतीसह रॉबरी करणे, महाराष्ट्र विद्रुपीकरण अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या वाढत्या कारवायाची आरसीएफ पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.