पाकिस्तान सुपर लिग सामन्यावर बेटींग घेणार्या चौकडीला अटक
अंधेरीतील बंगल्यात वर्सोवा पोलिसांची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – पाकिस्तानात सुरु असलेल्या सुपर लिग २०-२० क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटींग घेणार्या एका टोळीचा वर्सोवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी बेटींग घेणार्या चार बुकींना पोलिसांनी अटक केली. प्रतिक नरेश पजवानी, पुखराज रजऊ ध्रुव, शुभम किशन बलवानी आणि शंतनू शंकर चक्रवर्ती अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन लॅपटॉप, अकरा मोबाईल, एक नोटबुकसह इतर मुद्देमाल जप्त केले आहे. बेटींगची रक्कम तीन विविध बँक खात्यात जमा होत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही बुकींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
आयपीएननंतर पाकिस्तानने सुपर लिगची सुरुवात केली होती. सध्या पाकिस्तानात सुपर लिगच्या २०-२० क्रिकेटचे सामने सुरु आहेत. गुरुवारी याच सामन्यातील इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लँडिएटर या दोन संघांमध्ये सामना खेळविण्यात आला होता. या क्रिकेट सामन्यावर अंधेरी येथून काही बुकी ऑनलाईन बेटींग घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांना मिळाली होती. वरिष्ठांना ही माहिती सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित बुकींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज दळवी, सज्जन लांडगे, पोलीस उपनिरीक्षक मनोज हावळे, पोलीस हवालदार अरळकर, पाडवी, पोलीस शिपाई किंजलकर यांनी अंधेरीतील वर्सोवा, ओल्ड म्हाडा, बंगलो क्रमांक तेराच्या पहिल्यावर अचानक छापा टाकला होता.
यावेळी तिथे चारजण लॅपटॉपवर मॅच बघून मोबाईलवरुन क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटींग घेत असल्याचे दिसून आले. या चौघांनाही नंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याचे नाव प्रतिक पजवानी, पुखराज ध्रुव, शुभम बलवानी आणि शंतनू चक्रवर्ती असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत पोलिसांनी एक बुक, अकरा मोबाईल, तीन लॅपटॉप, कॅश असा दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेटींगची रक्कम तीन वेगवेगळ्या बँक खात्यात जमा होत असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी नितीन ठोंबरे यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध जुगार प्रतिबंधकसह भारतीय टेलिग्राफ कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर चौघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.