दहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना क्रुर वागणूक

एकाच कुटुंबातील तीन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत दहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना क्रुर वागणुक देऊन सिगारेटचे चटके आणि वायरने मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार विक्रोळी आणि घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका कुटुंबातील तीन महिलांसह चौघांविरुद्ध पार्कसाईट आणि घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर येथे राहतात. शनिवारी त्यांचा दहा वर्षांचा मुलगा घाटकोपर येथील जुम्मा खान चाळ, युपी रेस्ट्रॉरंट, सुविध सेंटरजवळ उभा होता. यावेळी त्याचा परिचित फहाद मोहसीन खान ऊर्फ फा याने त्याला सिगारेटचा चटका दिला होता. याबाबत तक्रारदाराने जाब विचारताच त्याने त्यांना शिवीगाळ करुन कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर त्यांनी फहादविरुद्ध घाटकोपर पोलिसांत तक्रार केली होती.

दुसर्‍या घटनेत जाहिदा अन्सारी ऊर्फ राधिका, मन्नो अन्सारी आणि आईशा शेख या तीन महिलांविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांचे दोन मुले त्यांच्यासोबत तर दहा वर्षांचा मुलगा पत्नीच्या माहेरी राहतो. तो तिथे राहतो हे त्याची मावशी जाहिदा, सासूची बहिण मन्नो आणि आईशा यांना आवडत नव्हते. शनिवारी त्यांचा मुलगा रडत घरी आला. त्याच्याकडे रडण्याचे कारण विचारल्यानंतर या तिघींनी त्याला मारहाण करुन घरातून निघून जाण्यास सांगितले होते. तो घरी गेला नाही म्हणून त्यांनी त्याला अश्‍लील शिवीगाळ करुन पुन्हा वायरने मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्या शरीरावर वायरचे वळ उमटले होते.

हा प्रकार त्यांनी पार्कसाईट पोलिसांना सांगून तिन्ही महिलांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या तिघींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page