मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – प्रेमविवाह करुन घरातील सुमारे २२ लाखांची कॅश आणि दहा तोळ्याचे दागिने चोरी करुन सासरी गेलेल्या विवाहीत मुलीला वनराई पोलिसांनी अटक केली. आरती दिनेश द्विवेदी असे या मुलीचे नाव असून तिच्याविरुद्ध चोरीसह अपहाराच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.
दिनेश प्रसाद द्विवेदी हे गोरेगाव येथे त्यांच्या पत्नी, तीन मुले आणि मुलगी आरतीसोबत राहत होते. याच परिसरात त्यांची एक पानाची टपरी असून ते दुकान त्यांच्यासह त्यांचे तिन्ही सांभाळतात. त्यांची मुलगी आरती ही एका खाजगी बँकेत कामाला होती. व्यवसयायातून मिळणार्या उत्पनातून ते काही रक्कम बचत होते. ही रक्कम ते आरतीकडे देत होते. गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांनी थोडे थोडे करुन सुमारे २२ लाख रुपयांची बचत केली होती. तसेच मुलाच्या लग्नासाठी आठ ते दहा तोळे दागिने बनविले होते, ते दागिनेही त्यांनी तिच्या मुलीकडे सोपविले होते. या पंधरा वर्षांच्या कालावधीत त्यांनी तिच्याकडे कधीही पैशांसह दागिन्याबाबत विचारणा केली नाही. त्यांना तिच्यावर पूर्ण विश्वास होता. ३१ मे २०२४ रोजी त्यांचा मुलगा अजयने आरतीला फोन केला, मात्र तिचा फोन बंद येत होता. त्यामुळे त्याने तिच्या ऑफिसमध्ये फोन करुन आरतीविषयी चौकशी केली होती. यावेळी त्यांनी आरती कामाला आली नसल्याचे सांगितले. दुपारी दोन वाजता अजयला आरे पोलीस ठाण्यातून एक कॉल आला होता. यावेळी समोरुन बोलणार्या एका पोलीस अधिकार्याने आरतीने विजय नावाच्या एका तरुणासोबत प्रेमविवाह केल्याची माहिती दिली. या माहितीनंतर दिनेश द्विवेदी हे अजयसोबत आरे पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांना आरतीने विजयसोबत २०१८ साली विवाह केला होता. मात्र या विवाहाबाबत तिने कोणालाही काहीच सांगितले नव्हते.
रात्री दहा वाजता दुकानातून घरी आल्यानंतर दिनेश यांनी लोखंडी पेटीतील कॅश आणि दागिन्यांची पाहणी केली होती. यावेळी पेटीत सुमारे बारा लाखांची कॅश आणि दहा तोळे सोन्याचे दागिने नव्हते. आरतीने प्रेमविवाह करुन घरातील २२ लाखांची कॅश आणि सोन्याचे दागिने चोरी करुन अपहार केला होता. हा प्रकार उघडकीस येताच दिनेश द्विवेदी यांनी त्यांची मुलगी आरतीविरुद्ध जुलै महिन्यांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरतीविरुद्ध पोलिसांनी चोरीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिला तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.