चार कोटीच्या कर्जाच्या आमिषाने व्यावसायिक महिलेला गंडा
२८ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी वॉण्टेड आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – खाजगी अर्थपुरवठा करणार्या कंपनीतून चार कोटी बारा लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून एका महिला व्यावसायिकाकडून घेतलेल्या सुमारे २८ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी चंद्रकांत शाणप्पा गायकवाड नावाच्या एका वॉण्टेड आरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली. या दुकलीने कर्जाच्या नावाने अनेकांकडून त्यांचे वैयक्तिक कागदपत्रे घेतली होती, या कागदपत्रांच्या मदतीने विविध बँकेत खाती उघडून फसवणुकीची ही रक्कम संबंधित खात्यात ट्रान्स्फर करण्यास संबंधित तक्रारदारांना सांगितले जात होते. त्याच्याकडून पोलिसांनी ८४ धनादेश बुक, बँकेचे रबरी स्टॅम्प, मोबाईल जप्त केले आहे. त्याला बँकेचे स्टॅम्प कोणी दिले याचा आता पोलीस तपास करत आहेत.
ध्वनी आकाश मेहता ही महिला बोरिवलीतील गोराई परिसरात तिचे पती आकाश आणि सासू-सासर्यासोबत राहते. तिचे तिच्या पतीसोबत स्टेशनरीचा व्यवसाय असून त्यांच्या मालकीची इम्पेक्स एजन्सी नावाची एक कंपनी आहे. तिने तिच्या फ्लॅटसह व्यवसायासाठी विविध बँकेतून सुमारे अडीच कोटीचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तसेच व्यवसाय वाढीसाठी तिला आणखीन सत्तर लाख रुपयांच्या कर्जाची गरज होती. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. मात्र तिने विविध बँकेतून आधीच कर्ज घेतल्याने तिला आणखीन कर्ज मिळत नव्हते. याच दरम्यान तिची चंद्रकांत गायकवाडशी ओळख झाली होती. त्याने तिला एका खाजगी अर्थपुरवठा करणार्या कंपनीतून कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन कर्जासाठी तिचे काही कागदपत्रे घेतले होते. यावेळी त्याने मिडास फायनान्स कंपनीतून लोन मंजूर करुन तिला एका खाजगी बँकेचा धनादेश मिळेल असे सांगितले होते. कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याला आठ टक्के कमिशन देण्याबाबत त्यांच्यात एकमत झाले होते. त्यानंतर चंद्रकांतसह त्याचा सहकारी प्रदीप मिश्रा याने त्यांच्याकडे प्रोसेसिंग फी, विम्यासह विविध कारण सांगून पैशांची मागणी सुरु केली होती. त्यांचा विश्वास बसवा म्हणून त्यांनी कर्ज मंजूर झाल्याचा धनादेश त्यांना व्हॉटअपवर पाठवून दिला होता.
प्रदीप हा लोन मंजूर करण्यासाठी त्यांना मदत करणार होता. त्यामुळे या दोघांवर विश्वास ठेवून त्यांनी सुमारे २८ लाख रुपये पाठवून दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी कर्ज मिळवून दिले नाही. आज-उद्या करुन ते दोघेही लवकरच कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगत होते. मात्र कर्जाची ही रक्कम बँक खात्यात जमा झाली नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच ध्वनी मेहता हिने मालाड पोलिसांत या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चंद्रकांत गायकवाड आणि प्रदीप मिश्रा यांच्याविरुद्ध पोलिसांनी कर्ज मंजूर झाल्याचा बोगस धनादेश पाठवून कर्जासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या चंद्रकांतला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत प्रदीपला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.