मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या साडेबावीस लाख रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेखा पारिजात मेहता, पारिजात मेहता आणि कार्तिक पारिजात मेहता अशी या तिघांची नावे असून ते तिघेही राजस्थानच्या जयपूरचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून लवकरच बीकेसी पोलिसांची एक टिम जयपूरला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अल्पेश कमल झव्हेरी हे हिरे व्यापारी असून भायखळा परिसरात राहतात. त्यांचा वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये अमन जेम्स नावाचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. रेखा मेहता ही हिरे खरेदी-विक्रीच्या दलालीचे काम करत असून ती त्यांच्या परिचित होती. तिचे त्यांच्यासह भारत डायमंड बोर्समधील अनेक हिरे व्यापार्यांशी चांगली ओळख आहे. गेल्या वर्षी जून महिन्यांत रेखा ही तिचा पती पारिजात व मुलगा कार्तिक यांच्यासोबत त्यांच्या कार्यालयात आली होती. तिथेच तिने त्यांची पतीसह मुलाची ओळख करुन दिली होती. यावेळी या तिघांनी त्यांच्याकडे हिरे खरेदी करणारे काही ग्राहक असल्याचे त्यांच्याकडून क्रेडिटवर काही हिर्यांची मागणी केली होती. रेखा ही त्यांच्या परिचित असल्याने त्यांनी त्यांना हिरे दिले होते. त्याचे दिलेल्या मुदतीत पेमेंट करुन त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. तीन महिन्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे आणखीन काही हिर्यांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी सप्टेंबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत त्यांना कुरिअरद्वारे राजस्थानला २२ लाख ५० हजार रुपयांचे हिरे पाठविले होते. यावेळी त्यांनी एका आठवड्यात संपूर्ण पेमेंट किंवा विक्री न झालेले हिरे परत करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र त्यांनी त्यांचे आश्वासन पाळले नाही. काल केल्यानंतर ते तिघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. नंतर या तिघांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी बीकेसी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आठ महिन्यानंतर रेखा मेहता, पारिजात मेहता आणि कार्तिक मेहता एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांच्या तपासकामी एक टिम लवकरच राजस्थानला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.