मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ सप्टेंबर २०२४
मुंबई, – अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करुन एका वकिलाच्या पत्नीची बदनामी करुन तिचा मानसिक शोषण केल्याप्रकरणी मोहम्मद मलिक सलीम शेख या आरोपीस वर्सोवा पोलिसांनी अटक केली. मोहम्मद मलिक हा तक्रारदाराचा घरगडी असून त्याने त्यांच्या पत्नीच्या नकळत काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनविले होते. ते फोटो आणि व्हिडीओ मित्राला पाठवून त्यांच्यासह त्यांच्या पत्नीची बदनामीचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत त्याचा मित्र निजामुद्दीन हा फरार असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
५८ वर्षाचे तक्रारदार व्यवसायाने वकिल असून ते त्यांच्या पत्नीसोबत अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहतात. त्यांची पत्नी लेडीज जिमची मालकीण असून त्यांचा मोठा मुलगा हॉटेल व्यावसायिक तर लहान मुलगा शिक्षण घेत आहे. कोरोना काळात त्यांची पत्नी गरजू लोकांना जेवण वाटप करत होती. याच परिसरात मोहम्मद हा तरुण राहत होता. यावेळी त्याची त्यांच्याशी ओळख झाली होती. तो काहीच कामधंदा करत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याला जेवणाचे पॅकेट वाटण्यास तसेच पॅक करण्यास मदतनीस म्हणून कामावर ठेवले होते. याच दरम्यान त्याचे त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे वाढले होते. काही दिवसानंतर तो त्यांच्याकडे घरगडी म्हणून कामाला लागला होता. काही दिवस काम केल्यानंतर घरातील कामावरुन त्याचे त्यांच्या पत्नीसोबत सतत खटके उडत होते. त्यामुळे तिने त्यांना त्याला कामावरुन काढून टाकण्यास सांगितले होते. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांच्यातील भांडण वाढल्यानंतर त्यांनी मोहम्मद मलिकला कामावरुन काढून टाकले होते.
मार्च २०२४ त्याने त्यांना व्हॉटअप त्यांच्या पत्नीचे काही खाजगी फोटोसह अश्लील मॅसेज पाठविले होते. दुसर्या दिवशी त्याने पुन्हा त्यांच्या पत्नीचे काही अश्लील व्हिडीओ पाठविले होते. याबाबत त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारणा केली असता मोहम्मद मलिकने ते फोटो आणि व्हिडीओ तिच्या नकळत काढल्याचे सांगितले. तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ त्याने त्याचा मित्र निजामुद्दीन यालाही पाठविले होते. या फोटो आणि व्हिडीओवरुन ते दोघेही त्यांच्या पत्नीचा मानसिक शोषण करत होते. यावेळी त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. मात्र बदनामीच्या भीतीने तिने तक्रार केली नव्हती. काही दिवसांनी निजामुद्दीनने त्यांच्या पत्नीसह मोहम्मद मलिकचे काही अश्लील फोटो आणि व्हाईस रेकॉडिंग पाठविले होते. ते फोटो पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी निजामुद्दीनला कॉल करुन विचारणा केली असता त्याला ते फोटो मोहम्मद मलिकने पाठविल्याचे सांगितले.
या दोघांकडून त्यांच्या पत्नीची बदनामी आणि मानसिक शोषण सुरुच राहिल्यानंतर त्यांनी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मोहम्मद मलिक आणि निजामुद्दीन या दोघांविरुद्ध पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. या दोघांचा शोध सुरु असतानाच तीन महिन्यांपासून फरार असलेल्या मोहम्मद मलिकला अखेर पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत निजामुद्दीन हा फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.