मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ सप्टेंबर २०२४
मुंबई, – तृतीयपंथीच्या वेशात लुटमार करणार्या टोळीचा वर्सोवा पोलिसांनी पर्दाफाश करुन एका त्रिकुटास मालाडच्या मालवणी परिसरातून अटक केली आहे. गुलशेर मकबुल शेख, चिरंजीत प्रेमानंद मलिक आणि प्रितम वासुदेव मुडळ अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांसह इतर आरोपींनी एका सिनेकलाकाराची दिड लाखांची सोनसाखळी चोरी करुन पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या तिघांच्या अटकेने रॉबरीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहणारा तक्रारदार सिनेकलाकार आहे. मंगळवारी ३ सप्टेंेबरला रात्री भूक लागल्याने तो सातबंगला, आरामनगर परिसरातून जात होता. यावेळी एका तृतीयपंथीचा पेहराव घातलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याला धक्का देत त्याच्याकडील दिड लाखांची सोनसाखळी चोरी करुन एका रिक्षातून पलायन केले होते. या घटनेनंतर त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने बाईकवरुन रिक्षाचा पाठलाग केला. ही रिक्षा मालाडच्या मालवणी, गेट क्रमांक सातजवळ गेली होती. त्यानंतर संंबंधित रिक्षाचालक व आरोपी पळून गेले होते. या आरोपींचा शोध घेत असताना तिथे सात तृतीयपंथी आले. त्यांना पाहून ते दोघेही पळून गेले. घडलेला प्रकार त्याने नंतर वर्सोवा पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी दोन विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्यानंतर या पथकाने मालाडच्या मालवणी परिसरातून मिळालेल्या माहितीवरुन चिरंजीत मलिक, गुलशेर शेख आणि प्रितम मुंडळ या तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर प्रितमकडून पोलिसांनी चोरीची दिड लाखांची सोनसाखळी जप्त केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिन्ही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तपासात ही टोळी तृतीयपंथीचा पेहराव घालून शहरात लुटमार करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.