मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेशाच्या नावाने शिक्षिकेची फसवणुक
विलेपार्ले येथील घटना; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – पुण्यातील काशिबाई नवले मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश देतो असे सांगून एका शिक्षिकेची दोन भामट्यांनी सुमारे साडेपंधरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आदित्य मौर्या आणि मंजित सिंग या दोन्ही भामट्याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते दोघेही पळून गेले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मंजू सतीश सिंग ही महिला शिक्षिका असून विलेपार्ले येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला यश नावाचा मुलगा असून त्याला पुण्याच्या काशिबाई नवले मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश हवा होता. त्यासाठी सिंग कुटुबियांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांना संकल्प इनलाईटमेंट ऍण्ड सर्व्हिसेसचे आदित्य मौर्या आणि मंजित सिंग यांच्याविषयी माहिती समजली होती. ते दोघेही तिच्या मुलाला पुण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतील असे समजले होते. त्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत मंजू सिंगने त्यांच्याशी तिच्या मुलाच्या मेडीकल कॉलेजविषयी सविस्तर चर्चा केली होती. यावेळी त्यांनी मुलाला काशिबाई नवले मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी हमखास प्रवेश मिळवून देतो असे सांगितले होते. त्यासाठी तिने तिच्यासह तिच्या मुलीच्या बँक खात्यातून आदित्य आणि मंजित यांना १५ लाख ४३ हजार ५११ रुपये ट्रान्स्फर केले होते. उर्वरित रक्कम कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र या दोघांनी ऑक्टोंबरपर्यंत तिच्या मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही विविध कारण सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न करत होते.
या दोघांकडून कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याबाबत शंका निर्माण झाल्याने तिने त्यांच्याकडे प्रवेशासाठी दिलेल्या सुमारे साडेपंधरा लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र पैसै परत करतो असे सांगूनही त्यांनी आतापर्यंत तिला तिचे पैसे दिले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने विलेपार्ले पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आदित्य मौर्या आणि मंजित सिंग या दोघांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४१९, ४२०, १२० बी भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.