मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शेअरमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका तरुणीची फसवणुक केलयाप्रकरणी दोन ठगाविरुद्ध कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल लाल शहा आणि जयप्रकाश पाई अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
२७ वर्षांची तक्रारदार तरुणी ही मालाड येथे राहत असून एका खाजगी कंपनीत बिझनेस ऍनिलिस्ट म्हणून कामाला आहे. जुलै महिन्यांत तिला अनिल शहा नावाच्या एका व्यक्तीने शेअर मार्केटसंदर्भात एक मॅसेज पाठवून तिला मान्सून ट्रेडिंग योजनेची माहिती दिली होती. त्यानंतर तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भात दैनदिन अपडेट दिली जात होती. कुठल्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास किती रुपयांचा फायदा होईल याबाबत माहिती दिली जात होती. या दैनदिन अपडेट पाहिल्यानंतर तिने शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिने अनिल शहा आणि जयप्रकाश पाई यांच्या सांगण्यावरुन विविध कंपनीच्या शेअरमध्ये ६ लाख ६१ हजाराची गुंतवणुक केली होती. ३० ऑगस्टला तिला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने तिच्या खात्यातून काही पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला पैसे काढता आले नाही. त्यामुळे तिने अनिल शहाला संपर्क साधून ही माहिती सांगितली. यावेळी त्याने तिला पैसे काढण्यापूर्वी तिला काही कमिशन रक्कम जमा करावी लागेल.
ही रक्कम जमा केल्याशिवाय तिला पैसे काढता येणार नाही असे सांगितले. मात्र तिने कमिशनची रक्कम भरण्यास नकार दिला. त्यानंतर अनिल आणि जयप्रकाशने तिला प्रतिसाद बंद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अनिल शहा आणि जयप्रकाश पाई या दोघांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.