बारा वर्ष उलटूनही फ्लॅटचा ताबा न देता ३३ लाखांचा अपहार
अपहारासह फसवणुकीप्रकरणी विकासकासह इतरांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बारा वर्ष उलटूनही फ्लॅटचा ताबा न देता एका वयोवृद्ध महिलेची विकासकाने सुमारे ३३ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपी विकासक जयेश शहा याच्यासह इतर आरोपींचा कांदिवली पोलिसांनी शोध सुरु केला आहे. या विकासकाने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
६४ वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला ही तिच्या पतीसोबत अंधेरी परिसरात राहते. बारा वर्षांपूर्वी तिला नवीन फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान तिला तिच्या परिचित एका व्यक्तीने अंधेरीतील ओशिवरा परिसरात गौरव लेजंट नावाच्या एका इमारतीचे बांधकाम सुरु असून या इमारतीचे बांधकाम जयेश शहा याच्या कंपनीकडून सुरु असल्याचे समजले होते. त्यामुळे तिने कंपनीच्या कांदिवलीतील मथुरादास रोड, लक्ष्मी पॅलेसच्या कार्यालयात जयेश शहाची भेट घेतली होती. फ्लॅटसंदर्भात सविस्तर चर्चा केल्यानंतर तिने गौरव लेजंटच्या एक फ्लॅट बुक केला होता. या फ्लॅटसाठी तिने जयेश शहाला ३३ लाख ४९ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र सातव्या मजल्यापर्यंत काम झाल्यानंतर काही कारणामुळे इमारतीचे बांधकाम थांबले होते. जवळपास पाच वर्ष वाट पाहून त्यांनी बांधकाम सुरु केले नव्हते. त्यामुळे या महिलेने गुंतवणुक केलेली रक्कम व्याजासहीत परत करण्याची मागणी सुरु केली होती. यावेळी जयेशने तिला व्याजासहीत ४७ लाख रुपये देण्याचे मान्य केले.
मात्र त्याने दिलेल्या मुदतीत पेमेंट परत केले नाही. गेल्या बारा वर्षांपासून त्याच्याकडून फक्त आश्वासन देण्यात येत होते. मात्र त्याने पैसे परत केले नाही. नंतर तो अरेरावी भाषा करु लागला. जयेश शहाकडून फ्लॅटचा ताबा किंवा फ्लॅटसाठी दिलेले पैसे परत मिळत नसल्याने तिने घडलेला प्रकार कांदिवली पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कांदिवली पोलिसांनी जयेश शहासह इतराविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच संबंधित आरोपींना चौकशीसाठी समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.