हत्येच्या गुन्ह्यांतील महिलेसह दोघांना ४८ तासांत अटक

पूर्ववैमस्नातून हत्या केल्याचे तपासात उघडकीस

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२४
ठाणे, – हत्येच्या गुन्ह्यांतील एका महिलेसह दोघांना गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ४८ तासांत मुंब्रा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. सुप्रिया मच्छिंद्र वाघमारे आणि आमीर नूरमोहम्मद शेख अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पूर्ववैमस्नातून या दोघांनी दामोदर कोडिंबा पगडे या व्यक्तीची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

३० ऑगस्टला दुपारी चार वाजता मुंब्रा येथी आनंद कोळीवाडा, लक्ष्मी निवास इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे त्याची ओळख पटली नव्हती. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. मृतदेहाची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरु केले होते. या प्रयत्नात पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली होती. तपासात त्याचे नाव दामोदर पगडे असल्याचे उघडकीस आले होते. तो दादरच्या विजयकुमार दळवीनगराचा रहिवाशी होता. याच दरम्यान त्याच्या शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात दामोदरची अज्ञात मारेकर्‍यांनी तिक्ष्ण हत्याराने गळ्यावर, छातीवर आणि पाठीवर वार करुन हत्या केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्‍यांचा शोध सुरु केला होता. मृत व्यक्तीच्या मोबाईलचे सीडीआर, एसडीआर प्राप्त करुन तांत्रिक विश्‍लेषण करुन पोलिसांनी जास्तीत जास्त मिळविण्याचा प्रयत्न केला होता.

सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सुप्रिया वाघमारे आणि आमीर शेख या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. यातील सुप्रिया ही दामोदर राहत असलेल्या परिसरात राहत होती. ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. तिनेच आमीरच्या मदतीने दामोदरची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. त्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करुन या दोघांनी पलायन केले होते. पूर्ववैमस्नातून सुप्रियाने ही हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले होते. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्‍वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक नितीन पगार, राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार, उमेश कोरडे, पोलीस हवालदार रहिश जाधव, अजीज तडवी, पोलीस शिपाई कृष्णा आव्हाड, अजिंक्य महाडिक यांनी केला.
एक किलो चरससह आरोपीस अटक
अन्य एका घटनेत चरस विक्रीसाठी आलेल्या अस्मत असगरअली सरदार या ३१ वर्षांच्या आरोपीस मुंब्रा पोलिसांसह ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक किलो दोन ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले असून त्याची किंमत साडेतीन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंब्रा येथील बायपास रोड, हजरत फकरुद्दीन शहा बाबा दर्गाजवळ काहीजण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय दवणे, पोलीस उपनिरीक्षक विजय सानप, अंमलदार कलगौंडा बन्ने, प्रमोद जगदाडे, प्रविण पाटील, प्रकाश गडदे, दिपक उदमले, समाधान जाधव यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या अस्मत सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ३ लाख ५० हजार ७०० रुपयांचा एक किलो दोन ग्रॅम वजनाचे चरस सापडले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अस्मत हा डोंगरीतील नवराजी पहाडी रोड, डोंगरी चाळ, मनवी मेंशन कंपाऊंड परिसरात राहतो. त्याने ते चरस कोठून आणले, तिथे तो कोणाला विक्रीसाठी आला होता. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page