पोलीस असल्याची बतावणी करुन ३५ लाखांची कॅश पळविली
खार व पायधुनीतील घटना; एकाला अटक तर इतरांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन दोन वेगवेगळ्या घटनेत तोतया पोलिसांनी सुमारे ३५ लाख रुपयांची कॅश पळवून नेली. याप्रकरणी खार आणि पायधुनी पोलिसांनी तोतयागिरी करुन जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून एका आरोपीस अटक केली तर पळून गेलेल्या चार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
रमशीद अश्रफ पी. पी हा मूळचा मल्लापुरमचा रहिवाशी असून सध्या झकेरिया मशिद स्ट्रिट परिसरात राहतो. तो मोबाईल ऍक्सेसिरीज मार्केटिंगचे काम करत असून सिद्धीक यांच्याकडे कामाला आहे. बुधवारी ४ सप्टेंबरला त्याला सिद्धीक यांनी ३० लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्याला दुसर्या दिवशी बँकेत भरायची होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी सात वाजता तो ही रक्कम घेऊन बँकेत भरण्यासाठी निघाला होता. घरापासून काही अंतर आल्यानंतर त्याला दोन अज्ञात व्यक्तीने थांबविले. या दोघांनी ते पोलीस असल्याचे सांगून त्याला पायधुनी पोलीस ठाण्यात यावे लागेल असे सांगून त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यापैकी एकाने त्याच्याकडील कॅश असलेली बॅग घेतली आणि तो तेथून निघून गेला. दुसर्या व्यक्तीने त्याला पोलीस ठाण्यात जाण्याचा बहाणा करुन चालण्यास सांगितले. काही वेळानंतर तो त्याला काळबादेवीच्या दिशेने घेऊन जाऊ लागला.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने जोरजोरात चोर चोर असा आरडाओरड सुरु केला. यावेळी स्थानिक लोकांनी त्या तोतयाला पकडून पायधुनी पोलिसांच्या ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या आरोपीचे नाव शफी अलीचेरी हुसैन असल्याचे उघडकीस आले. पळून गेलेला त्याचा सहकारी असून त्याचे नाव सलीम आहे. तो सध्या फरार असल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. याच गुन्ह्यांत शफी हा पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. समीर तीस लाखांची कॅश घेऊन पळून गेल्याने गुन्ह्यांतील रक्कम अद्याप हस्तगत करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशीच दुसरी घटना खार परिसरात घडली. यातील तक्रारदार तौसिक अनिस शेख हा वांद्रे येथे राहत असून व्यवसायाने वकिल आहेत. त्यांचा चुलत भावाचा रॉयल टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्ससह मनी ट्रान्स्फरचा व्यवसाय आहे. शनिवारी त्याने तौसिक शेख यांना पाच लाख सत्तर हजार रुपये बँकेत भरण्यासाठी दिले होते. रविवारी सकाळी साडेसात वाजता ते खार येथील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी जात होते. यावेळी त्यांनी सत्तर हजार एटीएममध्ये जमा केली. याच दरम्यान तिथे तीन तरुण आले आणि त्यांनी त्यांना ते क्राईम ब्रॅचचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यांच्याकडील बॅगेची तपासणी करुन त्यांनी त्यांच्याकडे पैशांविषयी विचारणा केली. यावेळी त्यांनी ही रक्कम त्यांच्या चुलत भावाची असून ती रक्कम एटीएमममध्ये भरण्यासाठी आल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ती कॅश ताब्यात घेऊन अजून दोन ते तीन आरेापींना अटक करायचे आहे असे सांगून ती कॅश घेऊन पलायन केले. घडलेला प्रकार नंतर तौसिक शेख यांनी खार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी खार पोलिसांनी तिन्ही तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.