व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने पिता-पूत्राची फसवणुक

८४ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – चांदी व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने पिता-पूत्रांची सुमारे ८४ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध खार पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. नैतिक मदनलाल जैन, मदनलाल जैन आणि भाविक अशी या तिघांची नावे आहेत यातील नैतिक आणि मदनलाल हे पिता-पूत्र तर भाविक हा त्यांचा जावई असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे.

हितेश मोहन श्रॉफ हे खार येथे राहत असून त्यांचा एअरनेट वायरलेस ब्राडबँड या नावाने मुंबई शहरात इंटरनेट सर्व्हिस प्रोयव्हायडरचा व्यवसाय आहे. त्यांच्या वडिलांचा पूर्वी फोर्ट परिसरात ज्वेलरीचा व्यवसाय होता. याच व्यवसायदरम्यान त्यांची मदनलाल जैन यांच्याशी ओळख झाली होती. त्याचा काळबादेवी परिसरात चांदीच्या दागिन्यांचा होलसेल विक्रीचा व्यवसाय होता. गेल्या तीस वर्षांपासून त्यांच्याशी हितेश श्रॉफ यांचे घरगुती संबंध आहेत. २०१६ साली त्यांचे वडिल मोहन श्रॉफ आणि भाऊ राकेश श्रॉफ यांनी स्वतचा कपड्याचा व्यवसाय सुरु केला होता. याच दरम्यान ऑक्टोंबर २०२३ रोजी मदनलाल आणि नैतिक जैन हे त्यांच्या दुकानात आले होते. या दोघांनी त्यांना त्यांचा लोटस ट्रेडिंग ऑफ सिल्व्हर ऍटम ऍण्ड फॅशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरु असून या व्यवसायात त्यांना गुंतवणुक करण्याची ऑफर दिली होती. त्यांची कंपनी चायना या देशातून कमी दराने चांदीचे दागिने खरेदी करुन भारतातील ज्वेलर्स व्यापार्‍यांना होलसेलमध्ये विक्री करते. त्यातून त्यांना प्रचंड फायदा झाला आहे असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. जैन कुटुंबियांशी त्यांचे व्यावसायिक तसेच कौटुंबिक संबंध होते, त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी त्यांच्यासोबत व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

ऑक्टोंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्यांचे वडिल मोहन श्रॉफ व राकेश श्रॉफ यांनी त्यांच्याकडे ७५ लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना त्यांनी ३६ लाख रुपये परत केले होते. मात्र ४६ लाखांच्या मूळ रक्कमेसह व्याजाची ३० लाख रुपये दिले नाही. याबाबत वारंवार विचारणा करुन नैतिक, मदनलाल आणि त्यांचा जावई भाविक यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. जानेवारी महिन्यांत या तिघांनी ही रक्कम परत करण्याचे तसेच पैसे दिले नाहीतर त्याच किंमतीचे सिल्व्हर ज्वेलरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी पैसे किंवा चांदीचे दागिने दिले नाही. अशा प्रकारे या तिघांनी ६२ लाखांची मूळ रक्कमेसह व्याजाची २२ लाख रुपये परत न करता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नैतिक जैन, मदनलाल जैन आणि भाविक यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिन्ही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page