मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२४
मुंबई, – गिफ्ट पार्सलच्या नावाने एका अभिनेत्रीची ऑनलाईन फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन वर्सोवा पोलिसांनी अमनप्रित सिंग नाव सांगणार्या ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ९० लाखांच्या पार्सल गिफ्टसाठी नऊ लाख रुपये टॅक्स भरावा लागेल असे सागून या ठगांनी तिची पाच लाख दहा हजाराची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
शालिनी सत्यंद्र झा ही व्ही एफ ऍक्टर असून मालाड परिसरात राहते. ऑगस्ट महिन्यांत तिची अमनप्रित सिंग या व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. यावेळी त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते दोघेही मोबाईलवरुन एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी अमनप्रितने तो युकेमध्ये नोकरी करत असल्याचे तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने त्याला काहीच उत्तर दिले नव्हते. ८ ऑगस्टला त्याने तिला कॉल करुन तिच्यासाठी ९० लाख रुपयांचे एक गिफ्ट पार्सल पाठविल्याचे सांगितले. दुसर्या दिवशी ती तिच्या घरी होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो पार्सल विभागातून बोलत असल्याचे पार्सल डिलीव्हरीसाठी तिला नऊ लाखांचा कर भरावा लागेल असे सांगितले. त्यानंतर तिने अमनप्रितला कॉल केला होता. यावेळी त्याने तिला पैसे भरण्यास सांगितले. याच दरम्यान तिला आयकर विभागासह इतर यंत्रणेकडून कॉल येऊ लागले. त्यांनीही तिला गिफ्ट पार्सलला टॅक्स भरण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे तिने संबंधित विभागाला टप्याटप्याने पाच लाख दहा हजार रुपये पाठविले होते.
ही रक्कम देऊन तिच्याकडे आणखीन पैशांची मागणी केली जात होती. त्यामुळे तिने तिच्या मैत्रिणीला ही माहिती सांगून तिच्याकडे काही पैशांची मागणी केली होती. यावेळी तिच्या मैत्रिणीने तिला तो फ्रॉड कॉल असल्याचे सांगून पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने अमनप्रित सिंगला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने वर्सोवा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अमनप्रित सिंगविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.